औरंगाबाद : ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’, मासिआ, ‘एजेव्हीएम’ या उद्योग व व्यवसाय संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी कोविड नियमांचे पालन आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण जागरूकता अभियानाला सुरुवात झाली. हे अभियान १२ ते १६ जुलै दरम्यान राबविले जाणार आहे.
क्रांती चौक परिसरातील स्वातंत्र्य संग्राम स्मारक येथे सुनील चव्हाण यांनी अभियानाला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, या महामारीच्या काळातील लढाईमध्ये औरंगाबादेतील उद्योगांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून भरीव मदत केली. त्यामुळे हे जनजागृती अभियान लोकांमध्ये लसीकरणबाबतचा विश्वास नक्कीच निर्माण करेल. महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, पराग मंडलेचा, डॉ. नंदिनी तिवारी, डॉ. स्मिता नाळगिरकर यांनीही मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उद्योग क्षेत्रातील राम भोगले, ‘ सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमण आजगावकर, उपाध्यक्ष प्रसाद कोकीळ, ‘सीआयआय’ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष श्रीराम नारायणन, मुकुंद कुलकर्णी, संदीप नागोरी, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सतीश लोणीकर, नितीन गुप्ता, ‘मासिआ’चे किरण जगताप, अनिल पाटील, गजनान देशमुख, विकास पाटील, चेतन राऊत, तसेच ‘औरंगाबाद फर्स्ट’चे अध्यक्ष प्रीतीश चॅटर्जी, आदी उपस्थित होते.
उद्योग संस्थांनी सुरू केलेल्या या अभियानाची रॅली क्रांती चौकपासून निघून ती चिकलठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत गेली. तिथे आशा वर्कर्सचा सत्कार करण्यात आला व जास्तीत जास्त लसीकरण राबविलेल्या स्कोडा, वोल्सवॅगन, लिभेर अप्लायन्सेस, अलाईन कॉम्पोनेन्टस्, मायक्रॉनिक्स गेज, इथिकॉन कंट्रोल, लॅमीफॅब या उद्योगांना प्रमाण देऊन त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.