लातूर : नजर आणेवारीत चुकलेले प्रशासन अखेर आता सुधारित हंगामी आणेवारी काढताना दुरुस्त करुन आले आहे. महसूल प्रशासनाने काढलेली आताची सुधारित आणेवारी वस्तुस्थितीला धरुन असल्याचे विविध पक्ष शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु आता टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तगड्या उपाययोजना करण्याची गरज असल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी मांडल्या. आता शेतकऱ्यांच्या साऱ्या नजरा पिकविम्याकडे लागल्या आहेत. त्यात यंदा प्रथमच हवामानावर आधारित पिकवीम्याला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या पिकविम्यासाठी महसूलची ही आणेवारी उपयोगी पडणार आहे. चाऱ्याचा प्रश्न गंभीर जिल्ह्यात रबीच्या फक्त दोन टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेराच नसल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. ऊस हे एकमेव हिरव्या चाऱ्याचे पीक असले तरी यंदा उसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. जनावरांची जिल्ह्यातील संख्या मात्र दहा लाख ४१ हजार ७१७ च्या घरात आहे. एवढ्या जनावरांना ऐन उन्हाळ्यात जगवायचे असेल तर शेतकऱ्यांपुढे मोठा यक्ष प्रश्न आहे. मोठ्या शेतकऱ्यांकडील जनावरे कशीबशी जगतीलही. परंतु एक-दोन हेक्टरच्या आत शेती असलेल्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी शासकीय पातळीवर मोठ्या उपाययोजनांची गरज आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यावर पिण्याच्या पाण्याचे यंदा मोठे संकट आहे. लातूरसारख्या साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरासह तालुक्याची ठिकाणेही पिण्याच्या पाण्यासाठी आत्ताच तहानलेली दिसत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाची अत्यंत गरज आहे. शिवाय द्यायचे म्हंटले पाणी आणायचे कुठून हा प्रश्न प्रशासनापुढे आहे. यावर ठोस पावले उचलत प्रशासनाने आत्ताच जिल्हाभरातील पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षित केले आहेत. शिवाय आरक्षित पाण्याचा शेतीला उपसा होऊ नये म्हणून शेजारील गावांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम ही राबविण्यात आली आहे. परंतु डिसेंबर नंतर पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाचा यक्षप्रश्न आहे.
लातूर जिल्हा दुष्काळग्रस्तच
By admin | Updated: November 16, 2014 00:37 IST