राजूर : मंगळवारीय अंगारिका चतुर्थीचे महत्व लक्षात घेऊन सोमवारी सायंकाळनंतर चारही बाजूंनी पावसाची आस मनी ठेवून गणरायाचा जयघोष करीत भाविकांचे पायी लोंढेच्या लोंढे राजूरच्या दिशेने येत होते. यामुळे चौहोबाजूंचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते.गणेशभक्तांत मंगळवारीय अंगारिका चतुर्थीच्या दिवशी ‘श्रीं’ ृच्या दर्शनाचे विशेष महत्व आहे. दिवसेंदिवस मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढलेली आहे. या चतुर्थीला पायी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. अंगारकी चतुर्थीसाठी आज सोमवारीच सिल्लोड, अंबड, औरंगाबाद, देऊळगावराजा, फुलंब्री आदी मार्गावरून महिला, पुरूष, चिमुकले भाविक राजूरच्या दिेशेने मार्गक्रमण करताना दिसत होते. पायी येणाऱ्या भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था, संघटना व दानशूर मंडळींनी मोफत चहा, पाणी, फराळ, आंघोळीकरिता थंड व गरम पाण्याची सोय रस्त्यावर जागोजागी केलेली होती. सायंकाळपासून भाविकांची गर्दी राजुरात दाखल होण्यास सुरूवात झाली होती. रात्री ९ वाजेच्या सुमारास मोठी गर्दी वाढली होती.यावर्षी पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य चिंतातुर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनता राजूरेश्वराला पावसासाठी साकडे घालण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे अंगारिका चतुर्थीला लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गणपती संस्थानने भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी पावसापासून बचावासाठी दर्शन रांगेत निवारा, वैद्यकीय उपचार, पिण्यासाठी पाणी, पासधारक भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दर्शन रांगेत सीसीटिव्ही कॅमेरे तसेच महिला व पुरूष भाविकासांठी स्वतंत्र दर्शन रांगा आदी जय्यत तयारी केल्याचे गणपती संस्थानचे व्यवस्थापक गणेशराव साबळे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत जालन्याहून राजूरकडे जाणाऱ्या भाविकांचा ओघ सुरुच होता. विशेष म्हणजे पोलिसांनी जड वाहनांना या मार्गावरून प्रतिबंध केला तरीही काही वाहनांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अंगारिका चतुर्थीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज, संस्थानतर्फे सुरळीत दर्शनाची व्यवस्था मंंंगळवारीय अंगारिका चतुर्थीला राजूरेश्वराच्या दर्शनासाठी संभाव्य लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून भाविकांनी सुध्दा सुरळीत दर्शन घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन हसनाबाद ठाण्याचे स.पो.नि. शीतलकुमार बल्लाळ यांनी केले आहे. अंगारिका चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर संस्थान परिसराची बल्लाळ यांनी पाहणी केली. भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे, तसेच समाजकंटकांना अटकाव बसावा, या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह परिसरात २५ सीसीटिव्ही कॅमेरे बसििवण्यात आले, असून ते समाजकंटकावर नजर ठेवणार आहेत. असे बल्लाळ यांनी सांगीतले. दर्शन रांगेत सीसीटिव्ही कॅमेऱ्याची तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनरांगेत महिला भाविकांशी असभ्य वर्तन करणारे, मंगळसुत्र चोर, पाकीटमार व गोंधळ घालणारे समाजकंटक कॅमेऱ्यात कैद होणार आहे. चतुर्थीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत देशमुख, ईश्वर वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली २० पोलिस अधिकाऱ्यासंह २५० पोलिस कर्मचारी, २०० ग्रामसुरक्षा दलाचे जवान, स्वयंसेवक भाविकांच्या सुरळीत दर्शनासाठी सोमवार दि. १४ पासूनच मंदिर परिसरात सज्ज झाले आहे. राजूरात लाखो भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून वाहनधारकांनी मुख्य रस्त्यात वाहन उभे न करता वाहनतळात आपापली वाहने उभी करून सहकार्य करावे, रस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा बल्लाळ यांनी दिला आहे. अंगारिका चतुर्थी निमीत्त पोलिस व संस्थानकडून नियोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. भाविकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता निर्भयपणे दर्शन घ्यावे तसेच पोलिस व स्वयंसेवकांच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे. असे आवाहन स.पो.नि. शितलकुमार बल्लाळ यांनी केले आहे. दर्शन व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न संस्थानतर्फे करण्यात येत आहे.
लाखो भाविक राजुरेश्वराकडे...
By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST