तुळजापूर : प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका जीपचालकाने प्रवाशी दाम्पत्याला बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र हिसकावून वाहनासह पोबारा केला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मंगरूळ घाटावर घडली.तीर्थ खुर्द येथील भिमराव ज्ञानेश्वर गायकवाड हे पत्नीसह गावाकडे निघाले होते. वाहनाची वाट बघत ते तुळजापूर शहरातील गोलाई चौकामध्ये थांबले होते. याचवेळी चौकामध्ये एक जीप येवून थांबली असता या दाम्पत्याने तीर्थ खुर्द येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी जीपचालकाने ‘बसा, तिकडेच जायचे आहे’, असे म्हटल्यानंतर हे दाम्पत्य त्या जीपमध्ये बसले. मात्र, सदरील जीप तीर्थऐवजी मंगरूळ रस्त्याने निघाली. त्यावर या प्रवाशी दाम्पत्याने ‘आम्हाला मंगरूळला नाही, तीर्थला जायचे आहे’, असे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या चालकासह त्याच्या सहकाऱ्यांनी या दाम्पत्यास मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम दीड हजार रूपये आणि महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर या दाम्पत्यास निर्जनस्थळी सोडून देवून जीपचालक व त्याच्या सहकाऱ्यांनी पोबारा केला. या प्रकरणी अज्ञात जीपचालकाविरूद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (वार्ताहर)
जीपचालकाने दाम्पत्याला लुटले
By admin | Updated: January 8, 2015 00:57 IST