औरंगाबाद : जायकवाडीत सध्या ८२ टक्केपाणीसाठा आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार जायकवाडीत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे वरच्या धरणांमधील पाणी आता जायकवाडी धरणात सोडता येणार नसल्याचे गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी स्पष्ट केले. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १५ आॅक्टोबरला पाण्याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी समन्यायी पाणी वाटपाची बैठक गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात झाली. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याने खरिपासाठी २० टीएमसी पाणी वापरले असल्याचेही या बैठकीद्वारे समोर आले. बैठकीला नाशिकचे मुख्य अभियंता एस. ए. वाघमारे, नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, मुख्य अभियंता अरुण कांबळे, प्रभारी अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता ए. पी. कोहीकर, उपअधीक्षक अभियंता पी. पी. संत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मुळा, प्रवरा, गंगापूर, दारणा, पालखेड या पाच समूहातून एकूण ५७६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे. या पाचही समूहातून प्रकल्पीय अहवालातील तरतुदीनुसार ८६० द.ल.घ.मी. पाणी उचलण्याची तरतूद आहे. यामध्ये मुळा समूहातून १५९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्यात सिंचनासाठी १३१ द.ल.घ.मी. आणि पिण्यासाठी १३.२९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे.या समूहातून प्रकल्पातील खरिपासाठीची वापराची तरतूद १७२ द.ल.घ.मी. इतकी आहे. प्रवरा समूहातून म्हणजे भंडारदरा व निळवंडेतून १४६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. यामध्ये खरिपासाठी प्रकल्पीय तरतूद २६० द.ल.घ.मी. इतकी आहे. गंगापूर समूहातून ४२ द.ल.घ.मी. पाणी वापर झाला आहे. यामध्ये खरिपासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. केवळ नाशिक शहरास पिण्यासाठी ३७.७ द.ल.घ.मी. तर औद्योगिक १.७ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. दारणा समूहातून म्हणजे दारणा, कडवा, भाम, भावली, मुकणेमधून १६८ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. त्यांना पाणी वापरासाठी २८४ द.ल.घ.मी. प्रकल्पीय तरतूद आहे. पालखेड समूहातून म्हणजे वाघाड, करंजवण, ओझरवेअर, पालखेडमधून ५९ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर झाला आहे. प्रकल्पीय तरतूद १२१ द.ल.घ.मी.ची आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी ५७६ द.ल.घ.मी. पाण्याचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती या बैठकीद्वारे पुढे आली आहे.
६५ टक्क्यांपेक्षा अधिक साठ्यामुळे आता जायकवाडीला ‘वरचे’ पाणी नाही!
By admin | Updated: October 18, 2016 00:33 IST