जालना : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी पातळीत वाढ होणार असून, जमिनीत पाणी मुरल्याने पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच सिंचनाचा प्रश्न कायम निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.परतूर तालुक्यातील लोणी खु. येथे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या सिमेंट नाला बांध कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य बंकटराव सोळंके, तहसीलदार विनोद गुुंडमवार, चापते यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना लोणीकर म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असून, येणाऱ्या काळात वीज पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नासह शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय सरकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.या परिसराची पाणी पातळी खोली गेली असून, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून व इतर महत्त्वाकांक्षी योजनाच्या माध्यमातून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. लोणी खु. व परिसरात गेल्या वर्षी नालाखोलीकरण करण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात अशाच प्रकारच्या पाणी पातळीत वाढ घडून येणार असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला अनंतराव यादव, विनायकराव यादव, अंकुश यादव, माणिकराव राठोड, सुनील यादव, हरिभाऊ नागरे, गजानन यादव, भागवत कवडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानामुळे भू-जल साठ्यात वाढ होणार- लोणीकर
By admin | Updated: April 4, 2015 00:32 IST