श्रीपाद सिमंतकर , उदगीरएचबीएन कंपनीकडून परतावे मिळण्यास बराच विलंब होत असल्याने गुंतवणूकदार हैराण आहेत़ इतकेच काय तर शिल्लक हप्ते भरावे की नाही, या संभ्रमात गुंतवणूकदार अडकल्याचे दिसून येत आहे़ एचबीएन संदर्भात ‘लोकमत’मध्ये मालिका सुरु होताच गुंतवणूकदार, एजंट व कार्यालयीन अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे़ यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत़ दरम्यान, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सामजिक संघटनेने एचबीएन कंंपनीच्या उदगीर शाखेतील परतावा थकलेल्या गुंतवणूकदारांना रक्कम मिळवून द्यावे व न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे लेखी निवेदन उदगीरचे तहसीलदार गजानन शिंदे यांना दिले होते़ या विषयी संघटनेचे लातूर युनिटचे उपाध्यक्ष नरेंद्र येरोळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, गुंतवणूक थकलेल्या लोकांच्या लेखी तक्रारी संघटनेस प्राप्त झाल्या़ या तक्रारींची दखल घेत तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे संघटनेने सामान्य नागरिकांची होणारी कुंचबणा थांबावी व फसवणूक होवू नये, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले़ तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरुन परतावे देण्यास सांगितले होत़े़ परंतु, अजूनही परतावे मिळाले नाहीत़ अहमदपूर येथील राजपाल खंडू बैकरे या गुंतवणूकदारांनी फोनव्दारे संपर्क साधून प्रतिक्रीया दिली़ बैकरे व त्यांच्या सासू गंगाबाई महाके यांनी २००८ पासून सहामाही २३०० रु़ हप्ता भरला होता़ १७ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांची मुदत पूर्ण झाली़ त्यानंतर परताव्याची विनंती करुनही अद्याप त्यांना रक्कम हाती आली नाही़ तसेच शेवटचा हप्ता भरण्यास १० दिवस विलंब लागला असे कारण पूढे करीत मुदतपुर्तीच्या रकमेस ८ हजार रुपये दंडही आकारला गेला़ हप्ता विलंब होत आहे याची सूचनाही कंपनीने दिली नव्हती़ परताव्याची रक्कम संसारासाठी मोठा हातभार असल्यामूळे ती परत मिळावी अशी अपेक्षा ठेवून बैकरे कार्यालयात चकरा मारत आहेत़मुदतपुर्तीसाठी काही हप्ते शिल्लक असेलेले गुंतवणूकदार अशोक कप्ते यांनी त्यांच्या पत्नी वनमाला कप्ते यांच्या नावे एचबीएन मध्ये गुंंतवणूक केली आहे़ १८ हजार रुपये मुदतपुर्तीसाठी थोडके हप्ते शिल्लक असताना परतावे मिळत नसल्याची चर्चा ऐकून पुढील हप्ते भरावे किंवा नाही या विचारात असल्याचे सांगितले़
पैशाच्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांची धावपळ
By admin | Updated: May 7, 2015 00:57 IST