अतिक्रमणे आणि मोठ-मोठे खड्डे
औरंगाबाद : चंपा चौक ते दमडी महल या १०० फूट रुंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना या भागातून ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
उड्डाणपुलाखालील काम दोन वर्षांपासून रखडले
औरंगाबाद : सलीम अली सरोवरातील पाणी पावसाळ्यात कमाल तलाव मार्केट टाऊन हॉल उड्डाणपुलाखाली येत आहे. या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने उड्डाणपुलाखाली पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला; मात्र मागील दोन वर्षांपासून काम तसेच रखडलेले आहे. महापालिकेच्या या कामामुळे उड्डाणपुलाखाली एका बाजूचा रस्ता बंदच आहे.
शॉपिंग कॉम्प्लेक्सचा वापर स्वच्छतागृहासाठी
औरंगाबाद : महापालिकेने मोठा गाजावाजा करून टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलाचे नुकतेच लोकार्पण केले. व्यापारी संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या आत रात्री काही नागरिक स्वच्छतागृहासारखा वापर करीत आहेत. दिवसा आणि रात्री या भागात वाॅचमन नसतो त्यामुळे शॉपिंग कॉम्प्लेक्सचा दुरुपयोग सुरू आहे.
रोझ गार्डन कधी खुले करणार?
औरंगाबाद : महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून मजनू हिल येथील टेकडीवर सुंदर रोझ गार्डन उभारले आहे. मागील दीड वर्षापासून गार्डन बंद आहे. सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी गार्डन कधी खुले होईल असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.