मुजीब देवणीकर , औरंगाबादकेंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे अपील आयुक्तालय नागपूरला हलविण्यात आले. त्यामुळे त्रस्त उद्योजक आणि सेवाकरदात्यांनी कार्यालय परत औरंगाबादेतच ठेवा, अशी मागणी लावून धरलेली असताना केंद्र शासनाने औरंगाबादसाठी लेखापरीक्षणाचे एक स्वतंत्र आयुक्तालय मंजूर केले आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत या कार्यालयाचे स्वतंत्र कामकाज सुरू होणार आहे.केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाकडून दोन महत्त्वाची कामे करण्यात येतात. एक म्हणजे स्थानिक उद्योगांकडून तयार होणाऱ्या मालांवर अबकारी कर लावणे. दुसरे म्हणजे परदेशातून येणाऱ्या मालावर आयात शुल्क वसूल करणे. कामाचा व्याप कमी असल्याचे कारण दाखवून अलीकडेच केंद्र शासनाने औरंगाबादेतील अपील कार्यालय नागपूरला हलविले. या निर्णयाच्या विरोधात औद्योगिक संघटना आणि सेवाकरदात्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.दरम्यान, केंद्र शासनाने औरंगाबाद शहरासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे लेखापरीक्षण आयुक्तालय मंजूर केले आहे. या कार्यालयात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, असा किमान शंभर कर्मचाऱ्यांचा स्टाफ असणार आहे. कार्यालयासाठी कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत ७५ हजार ते १ लाख स्क्वेअर फूट एवढे मोठे कार्यालय सध्या शोधण्यात येत आहे. लेखापरीक्षणाच्या कार्यालयासाठी सिडको किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा मिळेल का, यासंदर्भातही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत हे कार्यालय पूर्णपणे कसे सुरू करता येईल, यादृष्टीने केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाचे प्रशासन कामाला लागले आहे.केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाने देशभरातील कार्यालयांची आणि विविध पदांची पुनर्रचना केली आहे. त्यामध्ये औरंगाबादेत नव्याने लेखापरीक्षण कार्यालय देऊन अपीलचे कार्यालय हलविण्यात आले. अपीलसंदर्भात मराठवाड्यातील सेवाकरदात्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. केंद्र शासन देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करणार आहे. या करप्रणालीचे संपूर्ण नियंत्रण केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाकडे राहणार आहे. त्यावेळेस औरंगाबादकरांसह मराठवाड्यातील नागरिकांना अपील कार्यालयाची खूप गरज पडणार आहे. ४लेखापरीक्षण कार्यालय दिले त्यापेक्षा महत्त्वाचे कार्यालय हिरावून घेतल्याची खंत अनेक उद्योजकांनी व्यक्त केली. केंद्रीय उत्पादन शुल्क तथा आयात विभागाच्या प्रस्तावित स्वतंत्र आयुक्तालयाचे कामकाज आॅक्टोबरअखेर प्रारंभ होईल.४कार्यालयासाठी जागेचा शोध सुरू झाला असला तरी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याच्या इमारतीत आयुक्तालयाचे कामकाज सुरू होईल.
लेखा परीक्षणासाठी शहरात स्वतंत्र आयुक्तालय
By admin | Updated: September 2, 2014 01:55 IST