औरंगाबाद : शहरात उन्हाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर गेल्याने रविवारी दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी औरंगाबादकर दहा वेळेस विचार करीत होते. ‘वाढलेल्या पार्याचा’ सर्वाधिक फटका रविवारच्या आठवडी बाजाराला बसला. ग्राहकांनी तर पाठ फिरवलीच. विक्रेत्यांनाही भरदुपारी आपला गाशा गुंडाळावा लागला. गरिबांचा ‘निराला’ बाजार म्हणून ओळखल्या जाणार्या जाफरगेट येथील आठवडी बाजारात आज वर्दळ अजिबात नव्हती. उन्हाचा पारा चढल्याने दुपारी तुरळक प्रमाणात ग्राहक बाजारात आल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, हार्डवेअर विक्रेत्यांनी दुपारी ४ वाजेनंतर गाशा गुंडाळणे सुरू केले. एरव्ही हे विक्रेते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थांबत असतात. भाजीबाजारात आज निम्मेच विक्रेते दिसून आले. एरव्ही येथे आठवड्याची भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. दरवेळी भाज्या पुरत नाहीत. आज मात्र निम्म्यापेक्षा जास्त भाज्या शिल्लक राहिल्याचे अंबादास सोनवणे या विक्रेत्याने सांगितले. कपडे विक्रेता खलीलभाई यांनी सांगितले की, आज लग्नतिथी असल्याने ग्राहकच नव्हे तर विक्रेतेही बाजाराकडे फिरकले नाहीत. आम्ही हातगाडी लावली; पण सकाळपासून चारच कपडे विकले. इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रेता सलीमभाई म्हणाले की, आजचा रविवार आमच्यासाठी ‘ब्लॅक डे’ ठरला. बाजारात अगोदरच वर्दळ कमी. त्यात काही ग्राहक आले होते तेही नुसतेच चौकशी करून निघून गेले. सेकंड हँड टीव्ही विक्रेत्यांकडे बोहणीसुद्धा झाली नव्हती. बाजारात येण्या-जाण्याचे भाडे खिशातून भरावे लागले, अशी प्रतिक्रिया सोहीलभाई यांनी व्यक्त केली. सरबत विक्रेत्यांची चांदी उन्हाचा पारा चढल्याने सरबत पिण्याकडे ग्राहकांचा कल वाढला होता. अवघ्या ५ रुपयांत मिळत असल्याने प्रत्येक जण दोन ते तीन ग्लास सरबत पीत होता. ‘आज नगद कल उधार’, ‘शरबत कूल, धूप गुल’ असे ओरडत सरबत विकले जात होते. जुना टीव्ही द्या आणि नवा टीव्ही घरी घेऊन जा, अशी आॅफर विविध इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये सुरू आहे. यात जुना एलसीडी टीव्ही देऊन ग्राहक एलईडी टीव्ही खरेदी करीत आहेत. हेच जुने सेकंड हँड एलसीडी टीव्ही रविवारच्या बाजारात विक्रीसाठी आणले जात आहेत. आता फ्लॅट टीव्ही हळूहळू आठवडी बाजारातून गायब होत असून, त्यांची जागा एलसीडी टीव्हीने घेतली आहे.
वाढलेल्या ‘पार्याची कमाल’
By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST