महेश पाळणे / सितम सोनवणे / बाळासाहेब जाधव ल्ल लातूर‘हेल्थ इज वेल्थ’ ही म्हण आता प्रचलित होत आहे. त्यामुळेच व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, प्रत्येक नागरिकांत व्यायामाविषयी जागरुकता झाली आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम किती महत्वाचा आहे, हे आता त्यांना कळून चुकले आहे. ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात २५ वर्षांपुढील ७० टक्के नागरिकांनी दररोज व्यायाम करीत असल्याचे मत नोंदविले असून, अनियमित व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के आहे. फास्टफूड व संगणकाच्या जमान्यात लहान मुलांसह अनेकांची प्रकृती स्थुल होत आहे. कमी वयातच विविध आजारांचे प्रमाण सध्या बळावत आहे. या कारणांमुळेच शरीराला काही तरी हालचाल होणे महत्वाचे आहे, हे नागरिकांना कळून चुकले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या व्यायामातून नागरिक आपले आरोग्य कसे सुदृढ राहील, याकडे भर देत असल्याचे समोर येत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात ७० टक्के लोक दररोज व्यायाम करतात. तर ३० टक्के कधी कधी व्यायामाचा आधार घेतात. ६४ टक्के व्यक्ती चालण्याचा व्यायाम करतात. २२ टक्के लोकांमध्ये व्यायामशाळेचे (जीम) फॅड असल्याचे समोर आले आहे. १४ टक्के नागरिक पोेहण्याच्या छंदातून आपला शारीरिक व्यायाम करतात. मैदानी खेळांच्या बाबतीत ३४ टक्के लोकांची क्रिकेट खेळाला पसंती दिसते. २७ टक्के लोक सायकलिंगचा आधार घेत व्यायाम करतात. २२ टक्के लोकांमध्ये मनोरंजक असणाऱ्या व्हॉलीबॉलच्या खेळाचा आधार घेतव्यायामाला महत्त्व दिले जाते. तर १७ टक्के नागरिक कोणत्याच प्रकारचा मैदानी खेळ खेळत नसल्याचे या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. व्यायामाच्या वेळेबाबत १८ टक्के लोक दोन तास, ३७ टक्के लोक अर्धा तास, तर ४५ टक्के लोक १ तास व्यायाम नियमित करतात. ४८ टक्के नागरिक योगासनाचा आधार घेत दैनंदिन व्यायाम करतात. ३७ टक्के लोक प्राणायाम, तर ९ टक्के सुदर्शनक्रिया, तर ३ टक्के नागरीक विपश्यना व यापैकी कोणत्याच व्यायामाचा आधार घेत नसल्याचे सांगितले.कमी वयातच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थुलता यासह अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर, फास्टफूड व जंकफुडची वाढती लोकप्रियता यासह संगणकावरील बैठे खेळाच्या मनोरंजनाने कष्ट करण्याची प्रवृत्ती लोप पावत आहे. त्यामुळे अनेक आजार बळावत आहेत. आजाराच्या भीतीपोटी का होईना, चाळिशी ओलांडलेले नागरिक व्यायामाचा आधार घेत आहेत. ४दैनंदिन कामकाजामुळे वेळ मिळत नसलेल्या नागरिकांतही हळूहळू जागृती होत आहे. परिणामी, घराच्या छतावर, अंगणात काही जणांनी वैयक्तिक व्यायामशाळाच सुरू केल्या आहेत. यावर स्वत:बरोबर कुटुंबाचीही सोय झाली आहे. अत्याधुनिक साहित्यांचा आधार व्यायामासाठी घेतला जात आहे.शहरात क्रीडा संकुलासह नाना-नानी पार्क, दयानंद महाविद्यालयातील वॉकिंग ट्रॅक यासह विविध भागांतील ग्रीन बेल्टवर शहरातील नागरीक आपापल्या सोयीनुसार नियमित सकाळी व सायंकाळी व्यायाम करतात. जलद चालण्याच्या व्यायामाचा आधार जास्तीत जास्त नागरिकांतून होत असल्याचे चित्र आहे. यासह योगासन, प्राणायाम व अन्य मैदानी खेळांच्या माध्यमातूनही युवक व ज्येष्ठ नागरिक व्यायाम करतात. क्रीडा संकुलासह नाना-नानी पार्क येथे सकाळ व सायंकाळच्या वेळेत वॉकिंग करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. यावरून आरोग्याविषयी जागरुकता वाढल्याचे दिसते.
आरोग्यासाठी जागरुकता वाढली
By admin | Updated: April 29, 2015 00:54 IST