जालना : मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा देण्याचा निर्णय आता लवकरच घेतला जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकांमुळे याबाबतची कार्यवाही लांबणीवर पडली होती. जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे. त्यापैकी जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे नगरपालिका अस्तित्वात आहेत. मात्र बदनापूर व जाफराबाद या जुन्या तसेच मंठा व घनसावंगी या गेल्या पंधरा वर्षात झालेल्या नवीन तालुक्याच्या ठिकाणी अद्यापही ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या निर्णयानुसार या चारही ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा मिळणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचा, ग्रामसभेचा व जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या काळात आगामी महिन्यात नगर पंचायतींची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विधानसभा निवडणूक प्रक्रियेपूर्वीच जिल्हा प्रशासनाने या चारही ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेतली होती. ग्रामपंचायतींना आता नगर पंचायतींच्या अस्तित्वामुळे काही जिल्हा परिषद सदस्यत्वांचे पद जाणार, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. मात्र ज्या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा दिला जाणार आहे, तेथील जि.प. सदस्यांचे पद जाईलच असे नाही. (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली होती. परंतु आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्याने आगामी महिनाभरात सदर निर्णयाची अंमलबजावणी अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. ४ग्रामपंचायती असलेल्या गावाची लोकसंख्या त्या तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत अधिक असेल तर पद जाणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र, तरीही काही सदस्यांमध्ये भीती कायम आहे.
नगरपंचायतीची अंमलबजावणी लवकरच
By admin | Updated: November 3, 2014 00:38 IST