सोयगाव : सुरत (गुजरात) येथून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करून औरंगाबादकडे घेऊन जाणाऱ्या हायवाला शुक्रवारी सोयगाव तालुक्यातील जरंडी ते माळेगाव (पिंप्री) रस्त्यावर पकडून महसूल पथकाने धाडसी कारवाई केली. या कारवाईतून गुजरातमधील तापी नदी ते औरंगाबाद जिल्ह्यातील वाळू तस्करांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जरंडी ते माळेगाव (पिंप्री) या रस्त्यावरून हायवाद्वारे अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती सोयगाव तहसील कार्यालयाला मिळाली. तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या पथकाने या रस्त्यावर सापळा रचला. हायवाला (क्र. एमएच ०३ सीपी ३८५२) अडविले असता त्यात सुमारे चार ब्रास वाळू नेण्याचे काम सुरू झाले.
चालकाजवळ बडोदा (जि. सुरत) येथील तापी नदीच्या वाळूच्या पावत्या आढळून आल्या. मात्र, या पावत्याची मुदत मार्च महिन्यापर्यंत होती. अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे गुजरातच्या वाळूची वाहतूक सोयगाव तालुक्यात सुरू असल्याचे स्पष्ट झाले. ही वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, याबाबात शोध घेतला जात आहे. संबंधित दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले. तहसीलदार प्रवीण पांडे, महसूलचे नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली, तर हायवा मालकाला तीन लाख २१ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.