औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशानंतर शहरात कॅरिबॅगविरोधी मोहीम अधिक तीव्र झाली आहे. प्रतिबंधित प्लास्टिक तीनदा सापडले, तर चौथ्यावेळेस संबंधितावर गुन्हा नोंदविण्याचा इशारा दिला.
महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी पानदरीबा भागात एकत्रित कारवाई केली. या भागातील एकाच दुकानातून तब्बल १४० किलो प्रतिबंधित कॅरिबॅग जप्त करण्यात आल्या. कॅरिबॅगचा साठा करणाऱ्या दुकान मालकाला ५ हजार रुपये दंड करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात आणि देशात प्लास्टिकच्या कॅरिबॅग, प्लास्टिक पत्रावळ्या, ग्लास, थर्माकॉल आदींवर बंदी घालण्यात आली आहे. हे प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात महापालिकेने दोन वर्षांपूर्वी दंडात्मक कारवाईची मोहीम उघडली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ही मोहीम थंडावली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठवडाभरापूर्वी महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची बैठक घेऊन, दोघांनी संयुक्तपणे प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी आणि महापालिकेचे नागरिक मित्र पथकाने शहरात कारवाई सुरू केली.
पथकाने बुधवारी पानदारीबातील राज प्लास्टिक सेंटरमध्ये पाहणी केली असता, १४० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळले. हा साठा जप्त करण्यात आला. तसेच दुकान मालकाकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
आता मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई
आतापर्यंत शहरातील सर्वच दुकानांवर तपासणी करून कारवाई करण्यात येत होती. यापुढे प्लास्टिकच्या स्टॉकिस्टवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी महापालिकेच्या पथकासोबत असणार आहेत. काही दुकाने, स्टॉकिस्ट एक-दोनवेळा दंड होऊनही पुन्हा पुन्हा प्लास्टिकचा साठा व विक्री करत आहेत. आता तीनवेळा दंड झाल्यावर चौथ्यांदा अशा व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला जाणार आहे, असे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले.