पालम : तालुक्यातील फळा येथे संत मोतीराम महाराज यांच्या मंदिरावर १९ मे रोजी सकाळी ११ वाजता कळस बसविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासाठी ग्रामस्थांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पालम तालुक्यातील फळा येथे संत मोतीराम महाराज यांच्या मंदिरात वारकर्यांच्या सहभागातून वर्षभर सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहे. १९ मे रोजी सकाळी ११ वाजता भागवताचार्य किशोरजी व्यास यांच्या हस्ते १११ फूट उंचीचा मंदिरावर कळस बसविण्यात येईल तसेच हेलिकॉप्टरने मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. हा आगळावेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो भाविक फळानगरीत येणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. एक लाखाच्या आसपास भाविक कलशरोहण कार्यक्रमात सहभागी होण्याची आशा आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी चोख व्यवस्था केलेली आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गिरधारीलाल काकानी, विठ्ठलराव गोळेगावकर, शंकर नारलेवार, विठ्ठल पौळ, उद्धव पौळ आदींसह फळा ग्रामस्थांनी केले आहे. (प्रतिनिधी)
फळानगरीत लाखो भाविक लावणार हजेरी
By admin | Updated: May 17, 2014 00:58 IST