बदनापूर : शहरातील चौपदरी महामार्गावरील खराब रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे या मार्गावरील इमारतींना हादरे बसत आहेत. या घरांना तडे जात असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शहरातून जालना-औरंगाबाद हा चारपदरी महामार्ग गेलेला आहे. या महामार्गावर चोवीस तास जडवाहनांची वर्दळ असते. यामधे जालना येथून नाशिक, पुणे, औरंगाबादकडे लोखंडी सळई घेऊन जाणारे ट्रक, औरंगाबादहून जालना, नागपर, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यात जाणारे विविध कंपन्यांचे सुटे भाग व अन्य सामान घेऊन जाणारे ट्रक धावतात. तसेच या रस्त्यावरुन विविध लक्झरी बसेस व अनेक एस. टी. बसेसही धावतात. दिवसा या वाहनांची शहरातील गर्दीमुळे गती कमी असते. मात्र रात्रीच्या वेळी ही वाहने शहरात गर्दी नसल्यामुळे अतिवेगाने धावतात. परंतु या महामार्गावर शहरात काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी रस्ता ओबडधोबड असल्याने ही वाहने वेगात येऊन त्या ठिकाणी आदळतात यामुळे या महामार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना प्रत्येक जड वाहन गेल्यानंतर भूकंपासारखे हादरे बसतात. यामुळे काही घरांना तडे जात आहेत. अनेक इमारती कमकुवत होत आहेत. यामुळे या रस्त्यालगत लगत असलेल्या इमारतींना या खराब महामार्गामुळे धोका निर्माण झाला आहे.या रोडच्या देखभालीकडे संबंधित विभागाचे लक्ष नसल्यामुळे रहीवाशांना जीव मुठीत धरून आपल्या घरात राहावे लागत आहे. भविष्यात एखादी दुुर्घटना होऊ नये याकरीता या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)४शहरातून गेलेल्या या महामार्गाला पर्याय म्हणून येथे वळण रस्त्याची मंजुरी मिळालेली आहे. या रोडवर मोजणी करून ठिकठिकाणी खुणा करण्यात आलेल्या आहेत. परंतु त्यानंतर हा वळण रस्ता लालफितीतच अडकल्यामुळे या वळण रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प झाले आहेत.४हा वळणरस्ता लवकरात लवकर तयार झाल्यास शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीचा ताण कमी होईल तसेच शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असे चोवीस तास वाहनांच्या धुरामुळे होत असलेले प्रदूषण कमी होईल जेणेकरून शहरातील आरोग्यसुध्दा अबाधित राहील. त्यामुळे या वळणरस्त्याच्या प्रत्यक्ष कामकाजाकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी शहरातून होत आहे.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे घरांना हादरे
By admin | Updated: December 18, 2014 00:34 IST