करमाड : समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचे भलामोठा हार घालून स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी
चिकलठाणा येथील आंबेडकर चौकात रस्त्यावर चक्क क्रेनच उभी केल्याने सायंकाळी सहा वाजेपासून ते साडेसात वाजेपर्यंत तासभर वाहतुकीची कोंडी झाली. शेकडो वाहनांची सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांग लागल्यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त झाला.
दरम्यान, रस्ता रोखणाऱ्या या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली आणि पोलिसांनी क्रेन का हटविली नाही, असा सवाल कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांकडून उपस्थित झाला.
सायंकाळी जालना रोड अत्यंत वर्दळीचा बनतो. शेंद्रा एमआयडीसीतील कंपन्यांमधून सुटी झाल्यानंतर जाणाऱ्या बस, तसेच रोज ये-जा करणारे कर्मचारी, बँक कर्मचारी, शिक्षक आणि अधिकाऱ्यांची शेकडो वाहने या रस्त्यावरून धावतात. चिकलठाण्याकडून औरंगाबाद शहराकडे येणारी शेकडो वाहने या सत्कार कार्यक्रमामुळे रस्त्यावर उभी असल्याचे दिसले. अनेकांनी या कोंडीतून वाहने काढण्याचा प्रयत्न केला. काहींना त्यातून मार्ग काढता आला. मात्र, अनेक वाहने अडकली. सुमारे तासाभरानंतर मार्ग खुला झाला. मात्र, यादरम्यान वाहनधारक वैतागून गेले होते.
फोटो ओळी... धनंजय मुंडेंच्या सत्कारासाठी अशा पद्धतीने क्रेनच्या मदतीने हार घालण्यात आला. त्यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली.