औरंगाबाद : भारतीय दंत परिषदेच्या मानदंडानुसार महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच विद्यार्थी वसतिगृह असणे आवश्यक आहे. या अटीची पूर्तता करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांसाठी घाटीच्या कॅम्पसमध्येच वसतिगृह उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र, वर्षभरापासून वसतिगृह इमारत बांधकाम अर्धवट सोडण्यात आले आहे. याउलट घाटीच्या कॅम्पसमध्येच निवासी डॉक्टरांसाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. घाटीच्या प्रवेशद्वारावरच शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय ३० वर्षांपासून कार्यरत आहेत. यावर्षीपासून या महाविद्यालयाची बीडीएस अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५० करण्यात आली आहे.महाविद्यालयाचे वसतिगृह आमखास मैदान येथे आहे. दंत महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक मुलीच असतात. महाविद्यालयापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेले हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी सोयीचे नाही. शिवाय भारतीय दंत परिषदेच्या मानदंडानुसार महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच विद्यार्थी वसतिगृह असणे गरजेचे आहे. भारतीय दंत परिषदेच्या पथकाने या त्रुटींबाबत महाविद्यालयास कळविले होते. त्यानंतर शासनाने दंत महाविद्यालयाचे वसतिगृह घाटीच्या कॅम्पसमध्येच उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वसतिगृहाचे बांधकामही सुरू झाले. दोन मजली इमारतीचा स्लॅब टाकण्यात आला; परंतु मागील बाजूला उच्चदाब वीज तार असल्याने अन्य मजल्यावरील स्लॅबचे काम रखडले होते.
वसतिगृहाचे काम निधीअभावी रखडले
By admin | Updated: October 4, 2014 23:55 IST