बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांना सर्व कागदपत्रे तात्काळ मिळावीत या दृष्टीकोनातून जिल्हाभरात ३४० महा ई-सेवा केंद्राची स्थापना करुन २९६ केंद्रांना मान्यता देण्यात आली़ परंतू यापैकी प्रत्यक्षात १६३ केंद्रच सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून दुपटीने सेवा कर वसूल करण्याची प्रक्रिया या केंद्रामार्फत सुरु झाली़ केंद्रांनी विविध प्रमाणपत्र देण्याची जागा बदलली़ अन् घरपोच आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरु करुन प्रति १०० रुपये कार्ड प्रमाणे वसुली सुरुच ठेवली असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे़ त्यामुळे महा ई-सेवा केंद्राविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे़ महा ई-सेवा केंद्रातून सातबारा, ८ अ चा उतारा, जात प्रमाणपत्र, रहिवाशी, नॅशनॅलिटी, नॉन क्रिमिलिअर, राजपत्रातील नाव बदलणे, आॅनलाईन रेल्वे बुकींग यासह ६३ प्रकारच्या शासकीय सेवा व इतर सेवा अशा एकूण ३६० सेवा नागरिकांना देण्याचे काम या महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून केले जात आहे़ प्रत्येक प्रमाणपत्रासाठी दुपटीचा सेवाकर घेऊन विविध प्रमाणपत्र दिली जात आहेत़ शासनाने दिलेल्या नाममात्र शुल्काव्यतिरिक्त दुपटीचे सेवा कर महा ई-सेवा केंद्राकडून घेतली जात असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे़ आधारकार्डसाठी ५० रुपये, १०० रुपये असे चार्ज घेतले जात असल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी मुरुड-अकोला येथील महा ई-सेवा केंद्रावर कारवाई करुन हे केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यात आले़ लातूर जिल्ह्यातील ३४० महा ई-सेवा केंद्रांपैकी १६३ केंद्र सुरु आहेत़ तर इतर १७६ केंद्र जिल्हा प्रशासनाने सुचित केलेल्या नियमानुसार न चालविल्याने बंद करण्यात आली आहे़ तर इतर महा ई-सेवा केंद्रातील केंद्र प्रमुख इतरत्र शासकीय-निमशासकीय सेवेत नोकरीस लागल्याने जिल्ह्यातील ४९ केंद्र बंद करण्यात आली आहेत़ परिणामी, मोजक्याच केंद्रांवर कारभार चालू असल्याने नागरिकांची लूट वाढली असल्याचे दिसून येत आहे़महा ई-सेवा केंद्राचा हा गोरखधंदा कायम सुरुच आहे़ सकाळच्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील ३९ कॅम्पच्या माध्यमातूून ० ते ५ वयोगटातील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आधारकार्ड काढण्याचे काम सुरु आहे़ सकाळी १० ते ३ च्या दरम्यान कॅम्प घेऊन उर्वरीत वेळेमध्ये घरपोच सेवेतून आधारच्या नावाखाली लूट सुरु असल्याचे समोर आले आहे़ पालक दिवसभर रांगेत थांबून थकल्यावर त्यांना हा घरपोच सेवेचा सल्ला दिला जातो़
‘आधार’साठी प्रति व्यक्ती शंभर रुपयांत घरपोच सेवा
By admin | Updated: August 9, 2015 00:29 IST