विकास राऊत , औरंगाबादमराठवाड्यातील एकमेव अशा मनपाच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राणी दत्तक योजनेला घरघर लागली आहे. संग्रहालयात २५ प्रजातींचे १९३ प्राणी असून, त्यातील दोन पांढरे वाघ दत्तक घेतले आहेत. चार वर्षांत वाघांची जोडी दत्तक घेण्यापलीकडे कुणीही दाता दुर्मिळ प्राण्यांच्या संगोपनासाठी पुढे आलेला नाही. त्यामुळे ही योजना आता बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ पालिकेवर आली आहे. चार वर्षांमध्ये जनजागृती करूनही अल्प प्रतिसाद मिळाला आहे. प्राणी दत्तक घेणाऱ्यांना उत्पन्न करामध्ये सवलत देण्यात येणार होती. त्यानंतरही कुणी पुढे आले नाही. हैदराबाद येथील सर्व प्राणी दत्तक योजनेत असल्यामुळे त्या धर्तीवर देशभरात ही योजना लागू करण्याचा निर्णय केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने घेतला होता. प्राणिसंग्रहालय संचालकांचे मतप्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एच. नाईकवाडे म्हणाले, चार वर्षांपूर्वी ही योजना आली. त्यानुसार संग्रहालयातील दोन पांढरे वाघ दत्तक देण्यात आले. संग्रहालयाचा दर्जा वाढावा. प्राण्यांचे आरोग्यमान उंचावे. त्यांना चांगले वातावरण मिळावे, यासाठी चांगले अर्थसाह्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना होती. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. जागृती करूनही नागरिक पुढे आले नाहीत. २ कोटींचा खर्चसंग्रहालयातील प्राण्यांच्या संगोपनासाठी दरवर्षी ४५ लाख रुपयांचा खर्च येतो. चार वर्षांत २ कोटी रुपये प्राण्यांच्या संगोपनासाठी खर्च झाले आहेत. प्राणी दत्तक गेले असते तर हा खर्च वाचला असता. हा खर्च संग्रहालयाचा दर्जा वाढविण्यासाठी कामी आला असता. सर्व प्राणी दत्तक घेण्याऐवजी जे प्राणी दुर्मिळ आहेत, ते दत्तक घेण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. उदा. वाघ, बिबटे, हत्ती, कोल्हा, तडस यांना दत्तक घेण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असेही डॉ. नाईकवाडे म्हणाले. नवीन आराखड्यास मंजुरीप्राणिसंग्रहालय आराखड्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली आहे. काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राणिसंग्रहालय बाहेर हलविण्यासाठी जागा मिळालेली नाही. त्यामुळे शहरातील जागेतच संग्रहालयाचा विस्तार करण्यात येणार आहे, असे डॉ. नाईकवाडे यांनी सांगितले.
प्राणी दत्तक योजनेला घरघर !
By admin | Updated: June 20, 2014 01:11 IST