नागद : येथील गडदगड मध्यम प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठा झाला असून दोन दिवसांच्या पावसामुळे ही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. त्यानंतर उपसा झाल्याने उन्हाळ्यात प्रकल्पात अवघे ४ टक्के पाणी शिल्लक राहिले होते. यामुळे नागद व परिसरातील गावांवर पाणीटंचाईचे संकट आले आहे. जून महिन्यात फक्त ३० मि.मी. पाऊस झाल्याने ही चिंता अधिकच वाढली आहे. जुलै महिन्यात २४ तारखेपर्यंत १३० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद पाटबंधारे विभागात झाली आहे. या पावसामुळे प्रकल्पाची पाणीपातळी साडेनऊ टक्क्यापर्यंत गेली आहे, एवढाच काय तो दिलासा शेतकरी व गावकऱ्यांना मिळाला आहे.शाखा अभियंता के. जी. गोरे, डी. पी. सूर्यवंशी, रमेश कुंभे, महादू महाजन आदींनी धरणाची पाहणी केली. गडदगड नदीतून सायगव्हाण गावाजवळ दुसरीकडे जाणारे पाणी बंद करून गडदगड धरणातच पाणी येऊ देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून फक्त वापरण्यासाठीच ग्रामपंचायत नागदला पाणीपुरवठा करीत असल्याने पिण्याचे पाणी गावाबाहेरून आणावे लागत आहे. प्रकल्पात पाणी वाढल्याने पिण्याचे पाणी मिळेल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.उंडणगाव परिसरात पिके पिवळी पडू लागलीउंडणगाव : जोरदार वाऱ्यासह पडलेल्या भिजपावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारनंतर जोराचे वारे होते. या वाऱ्यामुळे गावातील अनेक घरांची पडझड तर झालीच; शेतातही मका व कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. ठिबक सिंचनवरील कापसाची अनेक झाडे सुकत असून, कोवळा मका पिवळा पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश उगले यांनी सांगितले की, हवामानातील अचानक बदलामुळे असे प्रकार होत असून, याचा प्रतिबंध करण्यासाठी एक किलो युरिया व एक किलो पोटॅशचे पाणी करून एक एकर क्षेत्रातील कापूस पिकास याची आळवणी (ड्रिचिंग) करावी. तसेच एक किलो युरिया व एक किलो पोटॅश १०० लिटर पाण्यात कालवून मका पिकास एक एकर क्षेत्रात द्यावे.
गडदगड प्रकल्पात साडेनऊ टक्के पाणी
By admin | Updated: July 26, 2014 01:11 IST