उस्मानाबाद : महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्यांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. महसूल हा जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांचा कणा समजला जातो. विविध योजनांची अंमलबजावणी तसेच देखरेख करण्याचे काम हा विभाग करतो. या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तंदरूस्त असावेत. त्यांच्या आरोग्याबाबतच्या तक्रारी दूर करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत आता महसूल प्रशासन या अधिकारी व कर्मचार्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचे आरोग्य कार्ड अर्थात हेल्थ कार्ड बनवित आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यातून महसूल अधिकारी-कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येकाची रक्त तपासणी, वजन, साखर तपासणी, हिमोग्लोबीन, ब्लडप्रशेर आदी चाचण्या करण्यात येणार आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक माहितीसह त्याच्या आरोग्यविषयक माहिती या कार्डवर राहणार आहे. या हेल्थ कार्डमुळे सर्वांनाच लाभ होणार आहे. संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना त्यांना आरोग्यविषयक समस्या माहिती झाल्यामुळे त्यादृष्टीने त्यांना काळजी घेता येणार आहे. याशिवाय त्यांच्यासाठी ताणतणाव व्यवस्थापन, योगावर्ग आदींचे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांना त्यांच्याकडे नेमून दिलेले काम हे करावेच लागते. मात्र, हे आहे ते काम अधिक उत्साहपूर्ण वातावरणात आणि तणावमुक्त परिसरात त्याने करावे, दर्जात्मक कामे करावीत, त्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. हे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीच अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा व तालुका पातळीवरील महसूल विभागातील अधिकारी-कर्मचार्यांचीही अशा प्रकारे वैद्यकीय तपासणी करून हेल्थ कार्ड बनविले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कर्मचार्यांना देणार ‘हेल्थ कार्ड’
By admin | Updated: May 22, 2014 00:14 IST