औरंगाबाद : जादूने पैशांचा पाऊस पाडून पैसे चौपट करून देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या साहेब खान पठाण ऊर्फ सत्तारबाबा (रा. नारेगाव) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने दोन नातेवाइकांनाही तब्बल सहा लाखांना चुना लावल्याचे उघड झाले आहे. फसविल्या गेलेल्या या दोन नातेवाइकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्याकडे याबाबत तक्रार केली. नारेगावातील रहिवासी असलेला सत्तारबाबा व त्याच्या साथीदारांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून राज्यभरातील अनेक नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. जादूने मी तुमचे पैसे चौपट करून देतो, पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून सत्तारबाबा व त्याचे साथीदार ग्राहक शोधून आणायचे. मग पैशांचा पाऊस पाडण्यासाठी ते जादूचा खेळ मांडायचे अन् तितक्यात सिडको एमआयडीसी ठाण्याचे पोलीस पथक तेथे दाखल व्हायचे कारवाईचे नाटक करत सगळे काही घेऊन जायचे... अशा पद्धतीने बाबा व पोलिसांच्या या टोळीने अनेकांना लुटले होते. मुकुंदवाडीतील रहिवासी असलेले सलीम पठाण आणि युनूस पठाण (रा. देवगाव, बदनापूर, जालना) हे या बाबाचे नातेवाईक आहेत. २०१२ मध्ये या दोघांना कार खरेदी करायची होती. त्यासाठी सहा लाख रुपये घेऊन दोघे गाडीच्या सौद्यासाठी नारेगावला गेले. तेथे बाबा भेटले. कशाला गाडीत पैसे घालता, माझ्यासोबत या, या पैशांचे चारपट पैसे करून देतो, असे त्याने सांगितले. आमिषाला बळी पडून हे दोघे बाबाच्या घरी गेले. तेथे बाबाने धान्याची रिकामी कोठी जादू करून नोटांनी भरून दाखविली. हे पाहून सलीम आणि युनूस यांनी बाबाकडे सहा लाख रुपये सुपूर्द केले. त्यानंतर बाबाने तुमच्यासाठी आणलेल्या औषधाच्या बाटल्या फुटल्या, आता नवीन बाटल्या आणल्यानंतर पाऊस पाडू, असे सांगून टाळाटाळ करूलागला. तगादा लावल्यानंतर बाबाने ‘दुसऱ्या एखाद्या पार्टीचे पैसे आले की त्यातून औषध आणून पैशांचा पाऊस पाडू, तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा, ड्रायव्हर म्हणून काम करा, आठ हजार रुपये महिना पगार देतो, असे सांगितले. काही महिने ड्रायव्हर म्हणून बाबाने या दोघांचा वापर केला आणि नंतर पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
भोंदूबाबाने नातेवाईकालाही सोडले नाही
By admin | Updated: August 20, 2014 00:57 IST