मारूती कदम ,उमरगाशासनाच्या कसल्याही निधीची अपेक्षा न करता तालुक्यातील हंद्राळ येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून आपल्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.हंद्राळ गावाला निजाम राजवटीच्या संघर्षाचा इतिहास आहे. कर्नाटकाच्या सिमावर्ती भागातील एक हजार लोकसंख्येचं छोटसं गाव. निजाम राजवटीत या गावाला पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले होते. सदर गाव हे तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने विकासापासून पूर्णपणे दुर्लक्षित आहे. या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता. शासनाच्या वतीने या गावाला जलस्वराजची योजना दिली होती. या योजनेच्या विहिरीला अपेक्षित पाणी नसल्याने या गावाचा पाणीप्रश्न कायम होता. चार वर्षापासून सातत्याने पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी एकत्रित येवून बैठक घेतली. बैठकीत गावाशेजारी असलेल्या दोन पाझर तलावातील गाळ शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय लोकसहभागातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. घरातील प्रत्येक माणूस तलावातील गाळ काढण्यासाठी सरसावला. दोन्ही तलावातील गेल्या अनेक वर्षापासून साचलेला गाळ काढून झाल्यावर या तलावात ग्रामस्थांच्या लोकसहभागातून विहीर खोदली असून मुबलक पाणीही लागले. एकेकाळी तलावात खड्डा खोदून खड्ड्यात झिरपणाऱ्या वाटी-वाटी पाण्यावर तहान भागविणाऱ्या ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासाठी येथील समाज विकास संस्थेचे भूमीपूत्र वाघ, विद्या वाघ, इंदूमती वडदरे, अॅड. स्मरणी बिडवे आदींसह कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.\गावची लोकसंख्या एक हजार असून, या गावात १२५ घरे आहेत. यापूर्वी गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी संपूर्ण गावात जलस्वराज योजनेंतर्गत पाईपलाईन करण्यात आली आहे. घराघरात घर तिथे नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोकवर्गणीतून पाणीपुरवठ्यासाठी कामगाराची नियुक्ती करण्यात आली आहे.एकेकाळी घागरभर पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करुन रोजगारावर पाणी सोडणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न लोकसहभागातून मार्गी लागत असून, गावातील शेतकरी व शेतमजुरांना पाण्याची उपलब्धता झाल्याने व परिसरातील दोन्ही पाझर तलावातील ग्रामस्थांच्या सहभागातून गाळ काढण्यात आल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ तूर्त हटला असून, परिसरात असलेल्या विहिरी व विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने या शिवारातील ५० हेक्टर सिंचन क्षेत्र वाढल्याचेही सरपंच रमेश हत्तरगे यांनी सांगितले.ग्रामस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणीपट्टीची रक्कम वेळेत भरणा करावी व गावात होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वितरणावर निगराणी ठेवण्यासाठी समाज विकास संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने सरोजा बिराजदार, सविता बडूरे, तानाजी बिराजदार, शहाजी कुंभार, यशवंत बिराजदार यांच्या समितीचे गठण करण्यात आले आहे.
लोकसहभागातून सोडविला हंद्राळ गावचा पाणीप्रश्न
By admin | Updated: January 1, 2015 00:25 IST