राम तत्तापूरे , अहमदपूरकुटुंबाची स्थिती मध्यम़ त्यामुळे महिला रोजंदाराच्या कामावर जाणे कुटुंबास मान्य नव्हते़ अशा परिस्थितीत घरातील सोने विकून आलेल्या पैशातून हायब्रीड, सुकडी खरेदी करुन लेकरांना जगविले, अशी भावना अहमदपूर येथील महिला शेतकरी सुलोचना मल्लिकार्जून हामणे यांनी व्यक्त केली़१९७२ मध्ये दुष्काळ पडला तेव्हा मी ३८ वर्षांचे होते, असे सांगून सुलोचना हामणे म्हणाल्या, माझे कुटुंब मध्यम स्थितीचे होते़ कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती़ कुटुंबामध्ये पती, सासू- सासरे आणि चार लेकरं़ घरची संपूर्ण जबाबदारी आम्हा पती- पत्नीवर होती़ कुटुंबास १८ एकर शेती होती़ त्यातील १० एकर कोरडवाहू आणि १८ एकर माळरान जमीन होती़ या शेतीतून काळी ज्वारी, कापूस, तूर, साळ अशी पिके घेतली जात असे़ कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित सुरु असताना १९७२ मध्ये दुष्काळ पडला आणि अन्न- धान्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली़ त्यावर्षी शेतीतूनही काही उत्पन्न आले नाही़ त्यामुळे घरातील मंडळींबरोबर लहान लेकरांना जगवायचे कसे असा यक्ष प्रश्न निर्माण झाला़ महिला रोजंदारीने जाणे कुटुंबास मान्य नव्हते़ त्यामुळे या अडचणीवर मात करण्यासाठी घरात असलेले सर्व सोन्याचे दागिणे विकले़ विशेष म्हणजे त्याकाळी भावही तेवढा नव्हता़ त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे कुणाकडे पैसे नव्हते़ त्यामुळे अगदी कमी दराने सोने विक्री करावे लागले़ सोने विक्री करताना जीव तीळ- तीळ तुटत होता़ परंतु, लेकरांकडे पाहिले की, सोन्याची काय किंमत? असे वाटत असे़ सोने विक्रीतून आलेल्या पैशातून हायब्रीड खरेदी केले़ त्याचबरोबर पती कामावर जात असल्याने त्यांना सुकडी मिळत असे़ आम्ही पती- पत्नी एक- एक दिवस उपाशी राहून लेकरांचे पोट भरले आणि त्या दुष्काळावर मात केली़ विशेष म्हणजे, पशूधनाला वैरण ही चाकूर तालुक्यातील हटकरवाडी येथून आणावी लागत असे़ तसेच पिण्यासाठी लागणारे पाणी चार- पाच किमीवरुन आणावे लागत़ पाण्यासाठी विहिरीवर गर्दी असल्याने अनेकदा खरडूनही पाणी आणल्याचे त्या म्हणाल्या़
सोने विकून जगविले कुटुंब !
By admin | Updated: December 21, 2014 00:09 IST