मानवत : ऐन सणासुदीच्या तोंडावर सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना गॅसची नोंद करण्यासाठी एजन्सीवर रांगा लावाव्या लागत आहे. परंतु व्यावसायिक प्रतिष्ठानावर मात्र घरगुती सिलिंडरचा सर्रासपणे वापर होत आहे. गेल्या एक ते दोन महिन्यांपासून मानवत शहरामध्ये सिलिंडरची कृत्रिम टंचाई केली जात आहे. यामुळे ग्राहकांना सिलिंडर आणण्यासाठी एजन्सीवर रांगा लावूनही सिलिंडर मिळेनासे झाले आहे. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. परंतु व्यावसायिक प्रतिष्ठानात मात्र घरगुती गॅसचा वापर सर्रासरपणे सुरू आहे. व्यवसायिकांना मात्र जादा पैसे देऊन घरगुती सिलिंडर वेळेवर मिळत आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना जादा पैसे देऊनही सिलेंडर मिळणे अवघड झाले आहे. घरगुती गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेकडे तहसील अथवा महसूल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ही जबाबदारी संबंधित अधिकारी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार होत असल्यामुळे डोळेझाक होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून प्रशासनाच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)