जालना : शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांच्या पात्रासह परिसरात उद्यान, ‘जाँगींग ट्रॅक’ तसेच बालोद्यान फुलविले जाऊ शकते. मात्र, यासाठी प्रशासनासह पालिका आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.पर्यावरण समितीचे अशासकीय सदस्य डॉ. सूर्यकांत हयातनगरकर यांनी या संदर्भातील ‘परिवर्तन जालना’ हा सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांची भेट घेऊन सादर केला. या विषयी जिल्हाधिकारी नायक यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे डॉ. हयातनगरकर यांनी सांगितले.दरम्यान, १७ जून रोजीच्या अंकात लोकमतने पुढाकार घेत ‘कुंडलिकेचा घोटला गळा’ या मथळ्याखाली पूर्णपान विशेष वृत्त प्रकाशित केले. यातून कुंडलिका नदीपात्रात ठिकठिकाणी अतिक्रमण, नदीत सोडलेले सांडपाणी, कचऱ्याचे ढीग साठल्याचे वास्तवदर्शी चित्र मांडण्याचा प्रयत्न केला. त्या पाठोपाठ डॉ. हयातनगरकर यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासन, पालिका, स्थानिक राजकीय नेते-पुढारी यांच्यासह सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्यास नदीपात्रांमध्ये हिरवापट्टा विकसित होण्यास वेळ लागणार नाही.शहरात मोजक्याच मोकळया जागा शिल्लक आहेत. त्यामुळे संभाजी उद्यान वगळता उद्यानच राहिलेले नाही. जवाहरबाग उद्यानाची दुरवस्था झाली आहे. बच्चेकंपनींसह आबालवृद्धांना विरंगुळ्याची साधने तोकडी होत चालली आहेत. त्यामुळे नदीपात्रांचा उपयोग उद्याने विकसित करण्यासाठी केल्यास नदीचे संवर्धन होईल, शहरवासियांच्या मनोरंजनासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी चांगले उद्यान उपलब्ध होईल, या उद्देशाने डॉ. हयातनगरकर यांनी हा प्रस्ताव दिल्याचे ते म्हणाले. शहरातून रामतीर्थ ते मंठा बायपासपर्यंत सुमारे सात ते आठ किलोमीटरपर्यंत नदीचा प्रवाह आहे. हा संपूर्ण परिसर विकसित होऊ शकतो. यात चांगल्या प्रकारे उद्यान विकसीत होऊ शकते. दर्गा परिसर ते लक्कडकोट पूल, गणेशघाट परिसरासह पंचमुखी महादेव मंदिराच्या दक्षिणेचा परिसर विकासासाठी उपयोगात आणता येऊ शकतो. यात जॉगींग ट्रॅक, हिरवळ, मुलांसाठीची खेळण्यांसह विविध प्रकारची झाडे आदी या ठिकाणी लावणे शक्य होईल. यामुळे प्रामुख्याने नदीचे संवर्धन, पर्यावरणाचे रक्षण, ‘ग्रीन झोन’ विकसीत होईल. प्रशासनासह स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी या प्रस्तावाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यास भविष्यात शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, हे निश्चित. (प्रतिनिधी)५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र होईल उपलब्धएकूण नदीपात्राच्या ५० टक्के जागा नदीप्रवाहासाठी सोडल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे सुमारे चाळीस ते पन्नास एकर जागा उद्यानासाठी तर काठावरील दोन्ही बाजूंचा एकूण १४ ते १५ किलोमीटरचा जॉगींग ट्रॅक उपलब्ध होऊ शकतो.या प्रस्तावानुसार सुरूवातीस नदीचे पाचफुटापर्यंत खोदकाम करून नदीप्रवाह निश्चित करणे. त्यानंतर प्रवाहाच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण, जॉगींग ट्रॅक तयार करणे. दुसऱ्या पातळीवर नदी प्रवाहाची पातळी तसेच पूर पातळी निश्चित करून उर्वरित जागेत हिरवळ विकसित करणे. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जागेत विविध प्रकारची झाडे लावणे, मुलांसाठी खेळणी बसविणे आदी कामे करता येऊ शकतात.दोन्ही नद्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. पात्र काही ठिकाणी अरूंद तर काही ठिकाणी लूप्त झाले आहे. केरकचरा, सांडपाणी प्रवाहात सोडण्यात येत आहे. नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवरच उद्यानाचा प्रस्ताव आहे. यामुळे नदी संवर्धन तर होईलच शिवाय शहरात मोठ्या प्रमाणात हिरवा पट्टा, सौंदर्यीकरण होईल. या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी प्रशासनासह राजकीय पुढारी आणि सामाजिक संघटनांनीही पुढाकार घ्यावा.-डॉ. सूर्यकांत हयातनगरकर (अशासकीय सदस्य, पर्यावरण समिती)
नदीपात्रांत साकारू शकते उद्यान
By admin | Updated: June 21, 2014 00:55 IST