फुलंब्री : पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने गणोेरी येथील पशुसंवर्धन विभागाची इमारत शोभेची वस्तू बनली आहे. परिणामी या भागातील पशुपालकांना आपल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
गणोरी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दवाखाना उभारण्यात आलेला आहे. मात्र, या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्तीच न झाल्याने तीन वर्षांपासून येथील इमारत केवळ शोभेची वस्तू बनली आहे. या ठिकाणी एक कर्मचारी सध्या कार्यरत आहे. गावातील पशूंच्या उपचारासाठी शेतकऱ्यांना किंवा पशूपालकांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यात शेतकऱ्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. येथील दवाखान्यात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब तांदळे यांनी पशू विभागाकडे केलेली आहे.
कोट्यवधीचा खर्च गेला वाया
एक कोटी २३ लाखांचा खर्च करून गणोरी गावात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांच्या दवाखान्याची इमारत उभारली गेली. शासनाने कोट्यवधीचा खर्च करून बनविलेली इमारत आता केवळ पांढरा हत्ती बनला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांविना ही इमारत ओस पडली आहे.
दहा हजार जनावरे
गावात शेळ्या २०००, मेंढ्या ५०००, गायी १०००, म्हशी २००, बैल १५०० असे मिळून ९७०० एकूण जनावरे आहेत. या जनावरांच्या पशुपालकांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. आधीच शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते. त्यात दुष्काळात तेरावा महिना अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
फोटो : गणोरी येथील पशुसंवर्धन विभागाची इमारत.