उस्मानाबाद : नगर पालिका, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, २७ मार्च २००० पूर्वी कार्यरत असलेल्या रोजंदारी, कंत्राटी अनियमित हंगामी मानधनावर नियुक्त असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विनाअट कायम सेवेत करावे, १९९३ सालीच्या कायम रोजंदारी कर्मचाऱ्यांना अनुकंपा धारकाचा व इतर शासकीय सेवांचा लाभ द्यावा, आदी विविध १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़शहरातील आर्य चौकातून संघटनेचे राज्य समिती सदस्य संभाजीराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा डॉ़बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला़ आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले़ यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले़ या मोर्चात संभाजीराजे निंबाळकर यांच्यासह बी़एस़मोरे, जिल्हाध्यक्ष अमर ताकमोघे, भारत साळुंके, कस्तुरे, एस़बी़इंगळे, कल्याणराव गायकवाड, भगवान उंबरे, ज्योतीराम कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील पालिकेतील कर्मचारी, संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
नगर पालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By admin | Updated: July 2, 2014 00:22 IST