जालना : बाजार समितीत आडतपट्टी खरेदीदारांकडून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने ५ जुलै रोजी घेतला आहे. या निर्णयाला विरोध करीत जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला असून, यामुळे भुसार, फळ भाजीपाला, व गुळ मार्केटमधील व्यवहार चार दिवसांपासून बंद आहेत.विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी व्यापारी अथवा कोणचाही मध्यस्थी न घेता थेट मार्केट समितीच्या यार्डाबाहेर भाजीपाल्याची विक्री केली. शेतकऱ्यांच्या थेट भाजीपाला विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. जालना बाजार समितीतीत माल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांकडून भुसार माल गुळ अडीच टक्के व भाजीपाला सहा टक्के प्रमाणे आडत वसुली करण्यात येत होती. राज्य शासनाने ५ जुलै रोजी अध्यादेश जारी करून आडत दराची रक्कम ही खरेदीदारांकडून आडतींयानी वसूल करावी, असे आदेश दिले आहेत. तसेच पणन संचालकांनीही याबाबत निर्देश दिले आहेत. त्याची अमलंबजावणी बाजार समितीने सुरू केल्यानंतर याला व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. शुक्रवारी सुरू झालेला संप सोमवारीही सुरू होतात. बाजार समितीचे सचिव चौगले म्हणाले, बाजार समितीत नियमित व्यवहार होणारे १२५ भुसार मालाची दुकाने आहेत. ५० फळ व भाजीपाला विक्रते व ४० फुलांची दुकाने आहेत. या सर्वांचे व्यवहार ठप्प आहेत. धान्याची आवकही कमी आहे. पुणे बाजार समिती सभापती संघाची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत आडतपट्टी वसुलीचा तीव्र निषेध करण्यात आला. वसुली थांबविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत झाला. साधारणपणे तीनशेपेक्षा अधिक बाजार समितींचे सभापती व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी भाजीपाला बाजार समितीत न आणता यॉर्डाबाहेर विक्री करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाणकारांनी सांगितले. जालना परिसरातील ४० खेड्यांतील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. सोमवारी मोंढ्या समोरील रस्त्याच्या दुतर्फा ही भाजी विक्री दिवसभर सुरू होती. थेट भाजीपाला विक्रीमुळे शेतकऱ्यांतूनही समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही मध्यस्ती, कमिशन विना थेट व्यापारी तसेच ग्राहकानां मालाची विक्री केली.
बाजार समितीत चौथ्या दिवशीही संप
By admin | Updated: July 12, 2016 00:49 IST