| ||
परभणी : शहरातील कडबी मंडई भागातील चार दुकानांचे शटर वाकवून रोख ३१ हजार रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना ११ जानेवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, श्वानाने एका घरापर्यंत माग काढला असून, पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. शहरातील कडबी मंडई भागात वेगवेगळ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. १0 जानेवारी रोजी रात्री दुकान मालकांनी आपली दुकाने बंद केली. ११ जानेवारी रोजी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला. संजय चौलवार यांचे संजय प्रोव्हीजन, बॉम्बे सनमाईक सेंटर, आर. के. स्टील अँण्ड हार्डवेअर आणि समीर इलेक्ट्रीकल्स या चारही दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश मिळविला. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील कोणत्याही वस्तूंना हात लावला नाही. फक्त गल्ल्यात असलेली रोकड पळविली. दुकानमालकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार संजय प्रोव्हीजन्समधून १५ हजार रुपये, समीर इलेक्ट्रीकल्समधून ९ हजार रुपये व अन्य दोन दुकानांमधून ६ हजार ९00 रुपये अशी ३१ हजार ४00 रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अशोक कोलते यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुनील बडे, नानलपेठ पोलिस ठाण्याचे रणखांब, मस्के, नितीन वडकर, बालासाहेब तुपसमुंद्रे आदींनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी संजय चौलवार यांच्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक अशोक कोलते तपास करीत आहेत./(प्रतिनिधी)
|