तालुक्यातील सवंदगाव येथील शेतकरी निवृत्ती रंगनाथ सोनवणे यांची गट नंबर ३९९ मध्ये सात एकर २२ गुंठे जमीन आहे. या शेतात त्यांनी विविध प्रकारची झाडे लावली होती. बांधावर लावलेली झाडे २०१६ मध्ये त्यांनी तोडून टाकली. मात्र, ही वाळलेली झाडे व बांधावर रोवलेली पोल असा एकूण २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञातांनी चोरून नेला. त्यानंतर सोनवणे यांनी या घटनेची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. मात्र, त्यांच्या तक्रारीची कुणीही दखल घेतली नाही. त्यांनी देखील पाठपुरावा सोडला नाही. सातत्याने पाठपुरावा केल्याने तब्बल पाच वर्षांनंतर मंगळवारी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओमीनाथ भानुदास शिंदे, रमेश भानुदास शिंदे, मंजाहरी भानुदास शिंदे, मोहन तुळशीराम शिंदे (रा. संवदगाव) या चार जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मोईस बेग करीत आहेत.
पाच वर्षांनंतर चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:04 IST