लोणीखुर्द : वैजापूर तालुक्यातील चिकटगाव शिवारात बुधवारी मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांनी वस्त्यांवर जाऊन धुमाकूळ घालत पाच ठिकाणी दरोडे घालून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी दरोडेखोरांनी मारहाणही केली. यात चार जण जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दरोडेखोरांची दहा ते बारा जणांची टोळी होती. त्यांनी प्रथम बाबू शहादू मोरे यांना घरात कोंडून टाकले व नंतर रमेश कचरू कुंदे यांच्या घराकडे मोर्चा वळवला व ते बाहेर झोपले असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून घरात नेले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना, त्यांच्या पत्नीला व मुलींना जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये रमेश कचरू कुंदे यांना चाळीस टाके पडले आहेत. दोन ठिकाणी मारहाण करून दरोडेखोर काही ऐवज घेऊन थोड्या अंतरावर असलेल्या बाबासाहेब नरहरी निघूट यांच्या वस्तीवर गेले व तेथेही लूट केली व शेवटी प्रकाश भानुदास महाजन यांच्या वस्तीवर लूट करण्यासाठी गेले असता ग्रामस्थांनी आरडाओरड सुरू केली, त्यामुळे त्यांनी तेथील मोबाईल व बॅटरी घेऊन पोबारा केला. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी औरंगाबाद, वैजापूर, शिऊर या तिन्ही ठिकाणचे श्वान पथकासह पोलीस दाखल झाले होते. पुढील तपास शिऊर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.बी.पाटील करीत आहेत. (वार्ताहर)लोणी खुर्द, चिकटगाव परिसरात या घटनेमुळे घबराट पसरली आहे. गेल्या महिन्यातही या भागात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
एकाच रात्री पाच दरोडे
By admin | Updated: May 23, 2014 01:06 IST