जालना : मृग नक्षत्र जवळ आल्याने सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे बियाणे बाजारात ग्राहकांची फारशी वर्दळ नाही. बळीराजा पावसाच्या तर बियाणे विक्रेते ग्राहकाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा चांगला पाऊस पडणार, असे अंदाज वर्तविले जात आहेत. बी-बियाणांची प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून जालन्याची ओळख आहे. मागील दोन वर्षापूर्वी पाऊस कमी पडल्यामुळे दोन-तीन वेळा पेरणी करूनही पीक वाया गेली. परंतु मागच्यावर्षी मृगाच्या पावसाने वेळेवर हजेरी लावली. यावेळीही मृग वेळेवर दाखल होईल, यंदाही वेळेवर पेरण्या होतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. खरीपपूर्व कामे पूर्ण केल्यानंतर शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु बी-बियाणांच्या बाजारात अद्यापही सामसूमच आहे. वास्तविकता पेरण्यांपूर्वी शेतकर्यांकडून बी-बियाणांची खरेदी सुरू होईल, असे अपेक्षित होते. त्या तुलनेत बाजारात कमालीचा शुकशुकाट आहे. आतापर्यंत बाजारात ३० ते ४० टक्के बियाणांची विक्री होते. मात्र यंदा केवळ १० टक्केच विक्री झाल्याचे विक्रेत्यांमधून सांगण्यात आले. बियाणांची विक्री छापील किंमतीप्रमाणेच व्हावी, कृषी विभागाची पथके बाजारावर नजर ठेवून असल्याचे सांगितले जाते. मात्र एका विक्रेत्याने सांगितले की, छापील किंमतीपेक्षा ५० ते १०० रुपये कमी मिळत आहे. कापसाबरोबरच सोयाबीन, मका, बाजरी आदी बियाणांनाही मोठी मागणी राहील, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
बियाणे बाजारात सामसूमच
By admin | Updated: June 4, 2014 01:33 IST