जालना : मठ पिंपळगाव (ता.अंबड) सजाच्या तलाठी ज्योती लक्ष्मीकांत खर्जुले यांनी फेर घेण्यासाठी १० हजार रूपयांची लाच मागितली. ही रक्कम खाजगी इसम भीमराव नामदेव तोगे यांच्यामार्फत स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने अंबड येथील राऊतनगर भागात पकडले. हा प्रकार १६ सप्टेंबर रोजी दुपारी २.४० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात ज्योती खर्जुले व एजंट भीमराव तोगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मठपिंपळगाव शिवारात खरेदी करण्यात आलेली ५६ आर शेत जमीन (गट नं.८२) फेर करून घेण्यासाठी तलाठी खर्जुले याच्याकडे १६ डिसेंबर २०१२ रोजी प्रस्ताव दाखल केला होता. वारंवार टाळाटाळ केली. शेवटी काम का रखडले हे लक्षात येत नाही का? असे सांगून १० हजार लाचेची मागणी केली.ही रक्कम राऊतनगर येथे कामकाजाच्या खोलीवर आणून देण्याचे सांगितले. ही रक्कम तोगे याच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने ताबडतोब तोगेला व खर्जुले यांना पकडले.ही कारवाई उपअधिक्षक प्रताप शिकारे, पोलिस निरीक्षक एस.एम. मेहेत्रे, व्ही.बी. चिंचोले, किशोर पाटील, संतोष धायडे, नंदू शेंडीवाले, गंभीर पाटील, अमोल आगलावे, संजय राजपूत यांनी केली. (प्रतिनिधी)
महिला तलाठी व एजंट लाचेच्या सापळ्यात
By admin | Updated: September 17, 2014 01:11 IST