जालना : जालना अतिरिक्त औद्योगिक वसाहतीला लागून असलेली नागेवाडी शिवारातील जमीन सिडकोला हस्तांतरित करण्यास शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवत रस्त्यावर उतरण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांना एका लेखी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी तो विरोध कळविला.४ जुलै रोजी औरंगाबाद येथील कार्यालयात केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. सिडकोबद्दल माहिती दिली. त्यात जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीपासून १ कि. मी. अंतर जमीन सोडून सिडकोला परवानगी देण्यात येईल, असे प्रदूषण महामंडळाने कळविले असल्याचे म्हटले. ग्रीन झोन व टॉवरलाईनसाठी जागा सोडण्याची सूचना करण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यात २५० हेक्टर जमीन जात आहे. तसेच टॉवर लाईनमध्ये २५ हेक्टर जमीन जात आहे. उर्वरित १७५ जमीन सिडाकोसाठी शिल्लक राहत असल्याचे नमूद केले. अंतर्गत रस्ते व वेगवेगळे आरक्षण हेही शेतकऱ्यांच्या ६० टक्के जमिनीवर टाकले जाईल, असेही ते म्हणाले. सिडकोची ‘नयना योजना’ सुरु आहे. या योजनेमध्ये जालना-नागेवाडी प्रकल्प राबविणार आहोत, असे केंद्रेकर यांनी नमूद करीत या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही विश्वासात घेऊ, असे स्पष्ट केले. दरम्यान, सिडको प्रशासनासोबतची बैठक संपल्यावर सर्व शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर २००८ पासून सिडकोने शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देता खरेदी-विक्रीला बंदी घातली आहे. सिडकोने जमीन खरेदीविक्रीवर घातलेली बंद उठवावी व जमिनी संपादित करु नये, असे लेखी निवेदन सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांना सादर केले. याउपरही सिडकोने शेतकरीविरोधी धोरण स्वीकारल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संतोष एखंडे, नितीन कोळेश्वर, सावरिया जटावाले, पी. एन. यादव, सुनील भावसार, योगेश जाधव, प्रभाकर जाधव संजय एखंडे, शिवाजी एखंडे, योगेश एखंडे, स्वप्नील एखंडे, मयुर एखंडे, सूरज भारजवाल, विशाल अग्रवाल, उदय शिंदे, साईनाथ लोखंडे, पुंडलिकराव शिंदे, सुरेश एखंडे, प्रकाश एखंडे, बालाजी तिरुखे, बाळोबा मुळे, सुरेश काळे, अशोक एखंडे, डॉ. सचदेव आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
नागेवाडीच्या शेतकऱ्यांचा सिडकोला तीव्र विरोध
By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST