आशपाक पठाण , लातूरलातूर शहरातील अरूंद रस्त्यांमुळे मुख्य मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते़ वाहनांची वाढती संख्या व वाहतुकीची कोंडी लक्षात घेता बहुतांश प्रमुख चौकात पोलिसांचा थांबा असतो़ चौकात थांबलेले वाहतूक शाखेचे पोलिस वाहतूक सुरळीत करण्यासाठी नव्हे तर खटले भरण्यासाठी थांबल्याचे चित्र दिसून येत आहे़ एवढेच नव्हे तर खटले भरण्यासाठी शहराची जबाबदारी असलेले वाहतूक शाखेचे पोलिस ‘हद्द’ सोडून महसुलासाठी धावत आहेत़गंजगोलाई प्रमुख बाजारपेठ पार्किंगसाठी जागा नाही त्यामुळे वाहने रस्त्यावरच लावण्यात येतात़ याठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी थांबलेले वाहतूक शाखेचे पोलिस बाजूच्या पानटपरी, हातगाड्यांवर थांबतात़ वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करून कुठला दुचाकी, आॅटोचालक खटला भरू शकतो, याची चाचपणी करण्यात व्यस्त असतात़ शिवाय, ग्रामीण भागातून आलेले दुचाकीचालक वाहतूक शाखेच्या कारवाईत सापडतात़ गुळ मार्केट चौक, बसस्थानक, शिवाजी चौक, आशोक हॉटेल चौक, पाण्याची टाकी, पाच नंबर चौक, दयानंद गेट, नंदी स्टॉप, जुना रेणापूर नाका या भागात वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते़ शिवाजी चौक वगळता अन्य ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलिस वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा खटलेच अधिक भरण्याचा महत्व देत वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करतात़ त्यांनाही वरिष्ठांनी कारवाईचे उद्दिष्ट दिल्याने मूळ कामाला बगल देऊन खटले भरण्यासाठी वाहने शोधावी लागत असल्याचे सांगण्यात आले़ मुळात शहरातील रस्ते अरूंद आहेत, वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नाही़ मनपाने पे अॅन्ड पार्कचा निर्णय घेतला असला तरी नेमकी जागा मिळत नसल्याने अंमलबजावणी प्रलंबित आहे़ खरेदीसाठी बाजारात आलेल्या चारचाकी वाहनधारकांना रस्त्यावरच वाहने लावावी लागतात़ शिवाय, विक्रेत्यांचा रस्त्यावर ठिय्या, दुकानदारांचे अतिक्रमण यातून मोठे असलेले रस्तेही अरूंद होतात़ वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत असल्याने कोंडी होते़ ४लातूर जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण अधिक आहे़ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात़ यातूनच अपघात होतात़ प्रवासी सुरक्षा व अपघात रोखण्यासाठी जिल्हाभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे़ शहर व शहराबाहेर वाहनांची कागदपत्र तपासणी सुरू आहे़ यातून चोरीची वाहने उघड होतील़ वर्षातून किमान एक ते दोनवेळा अशा प्रकारची मोठी मोहिम आवश्यक आहे़ शहरातही वाहतुकीची कोंडी होणार नाही, याचीही काळजी घेतली जात असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले़ पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई हद्द सोडून नाही़ ती नागरिकांच्या काळजीसाठी असल्याचे ते म्हणाले़
उद्दिष्टासाठी हद्द सोडून कारवाया !
By admin | Updated: December 1, 2014 00:50 IST