औरंगाबाद : भीषण दुष्काळी परिस्थितीत होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेजची घोषणा केली. केंद्राचे पथकही धावता दौरा करून गेले; पण अजूनही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही. मराठवाड्यातील तब्बल ४३ लाख शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे शासनाने मदत जाहीर केली असली तरी नेमकी किती मदत मिळणार हेही अजून गुलदस्त्यातच आहे. संपूर्ण मराठवाडा यंदा भीषण दुष्काळाला सामोरा जात आहे. पावसाअभावी विभागातील खरीप पीक पूर्णपणे हातचे गेले आहे. त्यामुळे विभागातील शेतकरी अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिनाभरापूर्वी दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेजची घोषणा केली. मराठवाडा आणि इतर विभागातील एकूण १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रासाठी नुकसानभरपाई म्हणून ३ हजार ९२५ कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद पॅकेजमध्ये केली आहे. यानंतर विभागात केंद्राचे पथकही पाहणी करून गेले; परंतु हे सर्व झाल्यानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत पदरात पडलेली नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत मिळणार आणि ती किती हेक्टरच्या मर्यादेत मिळणार हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विभागातील शेतकरी अजूनही चिंतेतच आहे. विभागात यंदा रबीचाही पेरा होऊ शकलेला नाही. खरीप गेले, रबीही गेली अशा अवस्थेत शेतकऱ्यांपुढे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठवाड्यात यंदा ४८ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला होता. या सर्व क्षेत्रांवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ४३ लाख शेतकरी असून, हे सर्व शेतकरी मदतीसाठी डोळे लावून बसले आहेत.
पॅकेजच्या घोषणेनंतरही हालचाल शून्य
By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST