उस्मानाबाद : शासनाचे नियम डावलून बोगस रेकॉर्ड तयार करणाऱ्या अकरा रॉकेल विक्रेत्यांचे परवाने पुरवठा विभागाने रद्द केले तर २४ जणांची अनामत जप्त करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर जिल्ह्यातील अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्यांवर धाडी टाकून रेकॉर्ड तपासण्यात आले़ नोव्हेंबर महिन्यात उस्मानाबाद तालुक्यातील २०, तुळजापूर ३७, उमरगा ३१, लोहारा १६, भूम ४२, परंडा २९, कळंब ६५ तर वाशी येथील १० अशा २५० केरोसीन विक्रेत्यावर अचानक धाडी टाकण्यात आल्या होत्या. तपासणी दरम्यान अनेक रॉकेल विक्रेत्याचा बोगस कारभार उघडकीस आला होता. चौकशीनंतर २५० पैकी ६९ रॉक्रेल विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यातील ३७ विक्रेत्यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयास खुलासा सादर केला होता. त्यानंतर पुरवठा विभागाने उस्मानाबाद तालुक्यातील ७, उमरगा २, लोहारा , भूम व परंडा येथील प्रत्येकी तीन व वाशी तालुक्यातील सहा अशा २४ रॉकेल विक्रेत्यांची अनामत रक्कम जप्त केली आहे. तर उस्मानाबाद तालुक्यातील ११, तुळजापूर ८, उमरगा ३, लोहारा ५, भूम ४, परंडा ५, कळंब ३० तर वाशी ३ असे ६९ रॉक्रेल विक्रेते दोषी आढळून आले होते. यातील ११ रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबीत करण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)
अकरा रॉकेल विक्रेत्यांचे परवाने निलंबित
By admin | Updated: December 23, 2014 00:01 IST