केतुरा : बीड तालुक्यातील केतुरा येथे अनेक ठिकाणचे विद्युत खांब कोलमडलेले आहेत़ यामुळे विद्युत तारा सैल होऊन जमिनीस टेकल्या आहेत़ या तारांमधून विद्युत प्रवाह जात असल्याने अपघाताचा धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़केतुरासह परिसरातील तांदळवाडी, सोनगाव, पारगाव अव्वलपूर, रुद्रापूर येथील विद्युत तारांची दुरवस्था झाली आहे़ काही दिवसापूर्वी केतुरासह परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला होता़ त्यामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब कोलमडलेले होते़ यामुळे तब्बल आठ दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला होता़केतुरासह परिसरातील अनेक विद्युत खांबांची आजही दुरवस्था झालेली आहे़ विद्युत खांब झुकल्याने तारा सैल झाल्या आहेत़ या परिसरातील राजूबाई गायकवाड, नामदेव गायकवाड यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारा तर चक्क जमिनीस टेकावयास आल्या आहेत़ असे असतानाही या विद्युत तारामधून विद्युत प्रवाह सुरुच असतो़ सध्या शेतकरी नांगरणी, पाळी, मोगडा आदी शेतीची कामे करीत आहेत़ अशा वेळी मशागती करण्यास विद्युत तारांमुळे अडचणी येत आहेत़सैल झालेल्या तारांना ताण देण्याची मागणी गेल्या १५ दिवसांपासून होत आहे़ मात्र याकडे महावितरणचे अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे़ शेतकरी जनावरे शेतामध्ये चरावयास सोडून देतात़ अशा जनावरांचा स्पर्श तारांना होऊन ते दगावण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे़ तारांमुळे शेतकऱ्यांच्याही जिवालाही धोका निर्माण झाला आहे़ तारांना तात्काळ ताण देण्याची मागणी व झुकलेले खांब दुरुस्त करण्याची मागणी धनंजय जगताप, श्रीकांत नवले, शिवाभाई करडे यांनी केली आहे़ (वार्ताहर)
केतुऱ्यात विद्युत तारा टेकल्या जमिनीस
By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST