परभणी: परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाली आहे़ विद्यमान सभापती खा़ बंडू जाधव यांनी सभापतीपद आणि संचालकपदाचा राजीनामा दिला आहे़ २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या विशेष सभेत ही निवड होणार आहे़ सभापतीपदाचा कार्यकाळ संपला होता़ विधानसभा निवडणुकीमुळे ही निवड लांबणीवर पडते की काय अशी चर्चा होती़ या बाजार समितीत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन सत्ता काबीज केली होती़ तीन वर्षांपूर्वी झालेल्या या निवडणुकीत सभापतीपदी शिवसेनेचे तत्कालीन आ़ बंडू जाधव यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसचे आनंद भरोसे यांची निवड झाली होती़ १८ पैकी ७ संचालक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर रहावे लागले़ या सभापतीपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत़ तीन वर्षांपूर्वी झालेल्या संचालकपदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली होती़ पॅनलप्रमुख म्हणून त्यावेळी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी प्रचाराची आर्थिक बाजू सांभाळली होती़ परंतु, या तीन वर्षांत प्रचाराचा खर्चही वसूल झाला नाही़ जो कोणी हा खर्च अदा करेल त्याच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडेल, अशी चर्चा बाजार समिती वर्तुळात ऐकावयास मिळत आहे़ खर्चाचा हा आकडा बघून अनेक इच्छुकांनी सभापतीपदाच्या शर्तीतून माघार घेतल्याचे कळाले़ (जिल्हा प्र्रतिनिधी)
कृउबास सभापतीची निवडणूक जाहीर
By admin | Updated: July 10, 2014 00:43 IST