उस्मानाबाद : घरी जावून टेकतो न टेकतो तोच शहर पोलिस ठाण्यातून फोन येतो आणि परत कामावर येण्याचा साहेबांचा फर्मान येतो़़ मनातच पुटपुटत कर्मचारी ठाणे गाठतात़़़ नुकताच ड्यूटीवर आलेल्या कर्मचाऱ्यांकडे पाहून पुन्हा पुटपुटायला सुरूवात करतो़़़ एवढेच काय तर दुपारी ‘वडापाव खा अन् काम करा’, असा सल्लाही मिळत आहे़ नव्हे रविवारी चक्क वडापाव खाण्यासाठी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांस पैसे दिले ! ही चित्तरकथा आहे, शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची !जवळपास दीड लाख लोकसंख्येच्या उस्मानाबाद शहर व हद्दीतील चार गावांमधील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे़ गत तीन वर्षापासून ठाण्यातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायम आहे़ तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही शहर ठाण्यातील कर्मचारी काही वाढलेच नाहीत़ कर्मचारी का वाढले नाहीत या मागचे ‘राजकारण’ कोणाला कळलेच नाही! गत काही दिवसांपूर्वी झालेल्या बदली प्रक्रियेत केवळ १७ कर्मचारी वाढीव मिळाले आहेत़ त्यातील काही कर्मचारी अद्यापही ठाण्यात हजर झालेले नाहीत़ त्यामुळे समन्स, कोर्ट, तुळजापूर मंदिर यासह इतर विविध शासकीय कामे वगळता ठण्यात अपुरेच कर्मचारी राहतात़ त्याच कर्मचाऱ्यांना बंदोबस्त, घटनास्थळी धाव घेणे, पेट्रोलिंग आदी विविध कामे करावी लागत आहेत़ त्यामुळे गुन्ह्याच्या तपासावर याचा विपरित परिणाम पडत आहे़ अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आणि वाढत्या घटनांमुळे शहर ठाण्यातील कर्मचारी हैराण झाले आहेत़ उत्तर पोलिस ठाण्यास मंजुरी मिळाली असली तरी ते सुरू कधी होणार हा प्रश्न कायम आहे़ त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी ‘वडापाव’ खाऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्यासाठी वाढीव कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची नेमणूक शहर पोलिस ठाण्यात करावी, अशी मागणी होत आहे़
वडापाव खा अन् काम करा
By admin | Updated: August 11, 2014 01:53 IST