करमाड : करमाड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी आयोजित कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके यांना आमंत्रित करण्यात आले. परंतु अध्यक्षा पोहोचण्याच्या आधीच आमदार हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते डॉ. प्रशांत दाते यांना लस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आल्याने अध्यक्षा नाराज झाल्या. दरम्यान, प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याने त्यांनी संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
लस देण्याच्या कार्यक्रमासाठी शेळके, बागडे यांच्यासह इतर महत्त्वाच्या व्यक्तिंना लेखी पत्र देऊन उपस्थित राहण्याचे कळवण्यात आले होते. सकाळी ९.३०च्या सुमारास हरिभाऊ बागडे हे करमाड येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले व त्यांनतर २० मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शेळके यादेखील पोहोचल्या. मात्र, अध्यक्षा येण्याअगोदरच लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरण सुरू झाल्याचे कळताच अध्यक्षा चांगल्याच भडकल्या. प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षा येईपर्यंत लसीकरण थांबवणे हेच संयुक्तिक होते. मात्र, तसे न झाल्याने शेळके यांनी करमाड येथील वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांची तक्रार करणार असून, नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.
आम्ही दोन दिवसांपासून लसीकरण सुरू करण्याच्या तयारीत व्यस्त होतो. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद अध्यक्षा, आमदार आदींना लेखी पत्र दिले होते. त्या पत्रानुसार बागडे हे सकाळी ९.३० वाजता आले. त्यांना पुढे लवकर जायचे होते. जिल्हा परिषद अध्यक्षा येणार असल्याची कसलीच माहिती आम्हाला नव्हती. त्यामुळे आम्ही डॉ. दाते यांना लस दिली व त्यानंतर काही वेळाचत अध्यक्षा येथे पोहोचल्या.
- डॉ. अपर्णा रंजळकर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, करमाड.
◆ फोटो - करमाड येथील आरोग्य केंद्रावर जिल्हा परिषदेचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांना पहिली लस देऊन लसीकरणाला शुभारंभ करण्यात आला.