भांडेगाव : हिंगोली - जामठी हा १५ कि. मी. चा रस्ता बऱ्याच वर्षापुर्वी झाला आहे; परंतु शासनाने राबविलेल्या ‘गाव तेथे एसटी’ या योजनेचा या गावांशी काहीही संबंध नसल्यासारखी स्थिती आहे. कारण या गावाला कोणतीच बस जात नसल्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत आहे.जामठी खु. - हिंगोली हा १५ कि. मी. असणारा रस्ता दळण-वळणाच्या दृष्टीने विकासात मागे राहिला आहे. भांडेगाव येथे उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात खांबाळा, सावा, पारोळा, जामठी, पांगरी, चोरजवळा या गावचे शेकडो विद्यार्थी दररोज सायकलने किंवा पायी ये-जा करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. या गावाला जाण्यासाठी खासगी वाहनाशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारची सोय नाही, व्यवस्थित रस्ताही नाही, बस तर नाहीच. स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाले तरीही या भागातील लोकप्रतिनिधींनी बस चालू करण्यासाठी कोणत्याही हालचाली केलेल्या दिसत नाहीत. भांडेगाव येथे रस्ता नसल्या कारणाने बस चालू होत नाही, असे सांगण्यात आले; परंतु आता हा रस्ता दुरूस्त करून सुद्धा बस चालू झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये नावाजलेले भांडेगाव लोकसंख्येच्या दृष्टीनेही मोठे आहे. येथील काही मंडळी राजकारणामध्ये चांगले सक्रीय झाली आहे. बलाढ्य शेतकरी असलेल्या भांडेगाव परिसरातील जामठी, साटंबा, भांडेगाव, नवलगव्हाण, सावा, पारोळा या गावांना बस चालू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गरजच नसल्यासारखे लोकप्रतिनिधींना वाटत आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना सकाळी सायकलने किंवा पायी सात ते आठ कि. मी. अंतर पार करून शाळा गाठावी लागते. शासनाने कित्येक गावांना मानव विकास मिशनच्या बसची सुविधा देण्यात आली. जेणे करून विद्यार्थिनींना शाळेत जाण्याचा त्रास होवू नये; परंतु भांडेगाव येथे शाळेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या १ हजार पेक्षा जास्त आहे. या विद्यार्थिनींना सकाळी सायकल किंवा पायपीट करून शाळा गाठावी लागते; परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीला या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही. या गावांचा रहदारी या रस्त्यावर अवलंबून आहे. या गावांना जाण्यासाठी बस नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आश्रय घेवून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघातात जीवही गमवावा लागला. तरी सुद्धा खाजगी प्रवासाशिवाय पर्याय नसल्याने खाजगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे. (वार्ताहर)
बससेवा नसल्याने शाळेसाठी पायपीट
By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST