औरंगाबाद : सिमेंट कंपन्यांची लॉबी सक्रिय झाली असून, उत्पादन कमी करून भाववाढ लादण्यास या लॉबीने सुरुवात केली आहे. मागील २५ दिवसांत ५५ रुपयांनी भाववाढ केली आहे. येत्या १५ दिवसांत आणखी ६० रुपये भाववाढ करण्याचा निर्णय या लॉबीने घेतला आहे. परिणामी, घरांच्या किमती ७ ते ८ टक्क्यांनी महागणार आहेत. बजेट कोलमडणार असल्याने नववर्षात स्वत:च्या घराचे स्वप्न बघणाऱ्यांचे ‘अच्छे’ दिनचे स्वप्न मात्र, भंगणार आहे. जानेवारी ते जून यादरम्यान शासकीय कामे मोठ्या प्रमाणात निघत असतात. यावरच आपला डोळा ठेवून सिमेंट उत्पादकांनी एकत्र येऊन भाववाढ केली आहे. ५ ते ३० डिसेंबरदरम्यान सिमेंटच्या ५० किलो गोणीमागे तब्बल ५५ रुपयांची भाववाढ झाली आहे. २९५ रुपयांची गोणी आता ३५० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. मुळात भाववाढीचे कोणतेही ठोस कारण नसतानाही सिमेंट कंपन्यांनी देशावर भाववाढ लादली आहे.यासंदर्भात औरंगाबाद जिल्हा सिमेंट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोज रुणवाल यांनी सांगितले की, सिमेंट कंपन्यांनी जाहीर केले आहे की, आणखी १ जानेवारी रोजी ३० रुपये व १५ जानेवारी रोजी ३० रुपये, अशी येत्या पंधरवड्यात ६० रुपये वाढ करून ४१० रुपये प्रतिगोणीपर्यंत भाववाढ नेऊन ठेवणार आहे. दरवर्षी सिमेंट कंपन्या १० रुपये, १५ रुपयांनी हळूहळू सिमेंटचे दर वाढवीत असतात. मात्र, एकदम ५५ रुपयांनी व नंतर १५ दिवसांत दोन टप्प्यांत एकदम ६० रुपयांनी भाववाढ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिमेंट कंपन्यांनी १० वर्षांपूर्वी एकदाच गोणीमागे ३२ रुपयांनी भाववाढ केली होती. यंदा भाववाढ तर केली आहेच शिवाय कंपन्यांनी ३० ते ४० टक्क्यांनी उत्पादनही घटविले आहे. यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याची खेळी कंपन्या खेळत आहेत. केंद्राचे नियंत्रण नसल्याने सिमेंट उद्योग देशवासीयांवर भाववाढ लादत आहे.
गृहेच्छुकांसाठी ‘अच्छे’ दिनचे स्वप्न आता भंगले
By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST