औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यात शस्त्र बाळगल्यासंबंधी अटकेत असलेला रोहित रेगे याचे नाव दोषारोपपत्रात नसल्याचे पत्र सीबीआयने सरकारी वकिलामार्फत औरंगाबाद खंडपीठात सादर केले. त्यानंतर न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने रोहितची ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर, महिन्याच्या पहिल्या सोमवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर बुधवारी (दि.९) जामीन मंजूर केला.यासंदर्भात सीबीआयचे उपअधीक्षक (बेलापूर, नवी मुंबई) मारुती शंकर पाटील यांनी २२ आॅगस्ट २०१८ रोजी तक्रार दिली होती. दाभोलकर हत्येच्या गुन्ह्यात सीबीआयने प्रथम सचिन अंदुरे याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने लपविण्यासाठी दिलेली शस्त्रे शुभम व अजिंक्य सुरळे यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार सीबीआयने सुरळे बंधूना अटक केली असता त्यांनी सदरील शस्त्रे रोहित राजेश रेगे (२०, रा. धावणी मोहल्ला) याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार २२ आॅगस्ट २०१८ रोजी सीबीआयने रोहितच्या घरी छापा मारून घराच्या गच्चीवरील एका पोत्यातून तलवार, पिस्तूल, तीन काडतुसे, एअरगन व दोन मोबाईल जप्त केले. सीबीआयने तिघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टचे कलम ३,४ व ५ खाली गुन्हा दाखल केला.रोहित रेगेला २२ ते २७ आॅगस्ट २०१८ पर्यंत पोलीस कोठडी, नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर रेगेने अॅड. नीलेश घाणेकर यांच्यामार्फत नियमित जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.याचिकेच्या सुनावणीच्या वेळी अॅड.घाणेकर यांनी दाभोलकर हत्येशी रोहितचा संबंध नाही. आरोपीचा दाभोलकर हत्येशी संबंध आहे का, याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतरही रेगे विरुद्ध संबंध असल्याचा पुरावा मिळाला नाही. २०१३ मध्ये दाभोलकर यांची हत्या झाली, त्यावेळी रोहित १५ वर्षांचा होता, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ३१ डिसेंबर २०१८ रोजी सीबीआयने पत्र पाठवून रोहितचा दाभोलकर हत्याप्रकरणी संबंध नसल्याचे सांगितले. या पत्राआधारे खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील सोनपावले यांनी काम पाहिले. रेगेतर्फे अॅड. नीलेश घाणेकर व वर्षा घाणेकर (वाघचौरे) यांनी काम पाहिले. त्यांना कुलदीप कहाळकर व धनराज हिंगोले यांनी सहकार्य केले.-----
डॉ. दाभोलकर खून खटल्यात अटकेतील रोहित रेगेची खंडपीठात जामिनावर सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:15 IST