जालना : जिल्ह्यात आजपर्यंत साधारणत: ८०० वनराई बंधारे विविध शाळा, ग्रामपंचायती, अंगणवाडीच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामविकास अधिकारी आशा, महिला बचत गट रोजगार सेवक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या श्रमदानातून तयार केली आहे. या बंधाऱ्यामुळे निसर्गाचा समतोल राहण्यास व पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत जि. प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केले. काम गुणवत्तापूर्ण होऊन प्रभावी पाणीसाठे निर्माण होण्यासाठी तथा साखळी पद्धतीने वनराई बंधारे घेऊन नाल्यावर ठिकठिकाणी पाणीसाठे निर्माण करून जलसंवर्धन करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पंचायत समिती स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या संकल्पनेतून शनिवारी पंचायत समिती जालना येथे कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रशिक्षणात अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांकडून या मोहिमेसाठी मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत व त्यांच्या सहभागाबाबत अभिनंदन करून ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व ग्रामस्थामधील ही उर्जा वनराई बंधारे आणि वृक्ष लागवडीसारखी मोहीम यशस्वी ठरत आहे. यातून निसर्गाचा समतोल साध्य करून पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करता येईल.या प्रशिक्षणात कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी वनराई बंधारे घेण्यासाठी जागा निवडीपासून ते बंधारा अस्थापित करण्यापर्यंतचे तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रत्येक गावात पाच बंधारे तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण तयार करणे. त्यामुळे चांगला पाणीसाठा निर्माण होऊन जलसंवर्धनास मदत होईल, असे सांगितले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे यांनी निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ८०० वनराई बंधारे तयार
By admin | Updated: October 1, 2014 00:33 IST