अणदूर : भाडेवाढ सहन करूनही एसटीचा प्रवास सुखाचा होण्याऐवजी दु:खाचा व डोकेदुखीचा ठरत असल्याची संतापजनक घटना गुरूवारी पहावयास मिळाली. तब्बल पन्नास प्रवाशी घेऊन जाणारी उमरगा-पुणे बस तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद पडली. या गाडीतील प्रवाशांना अणदूर बसस्थानकातून नेण्यासाठी दुसरी पर्यायी बस येण्यासाठी तब्बल पाच तास थांबावे लागले. उमरगा आगाराच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना अनेक वेळा अशा संकटांना तोंड द्यावे लागले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. उमरगा आगाराची उमरगा-पुणे ही बस क्र. एम.एच.४० एन.-९१९३ ही बस सुमारे पन्नास प्रवाशांना घेऊन जात होती. सदर बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली. अणदूर येथे पर्यायी बसने या प्रवाशांना नेण्याची व्यवस्था करण्यात आली परंतु तब्बल पाच तासानंतर पर्यायी बस आल्याने प्रवाशांना ताटकळत बसची वाट पाहावी लागली. उमरगा-पुणे ही लांब पल्ल्याची बस असतानाही प्रशासन गांभीर्याने याकडे पाहत नाही.सातत्याने या लांब पल्ल्याच्या वाहनांतही बिघाड होत असल्याने प्रवाशांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वीही अनेक वेळा लांब पल्ल्याच्या बसगाड्या बिघाड झाल्याने बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात उमरगा येथील आगारप्रमुख एम. के. वाकळे यांच्याशी संपर्क साधला असता,सदर बसही लांब पल् ल्याची असल्याने या बसमध्ये कसलाही दोष नाही. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात असल्याने ही गाडी तपासून संबंधितावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
बस बिघडल्याने प्रवाशांची हेळसांड
By admin | Updated: June 6, 2014 01:05 IST