गेवराई : येथील तहसील कार्यालयामध्ये विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे़ यामुळे परिसरात दलालांचा सुळसुळाटही वाढला असून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हेरुन त्यांची आर्थिक लूटही करीत आहेत़आठ दिवसांपूर्वीच शाळा, महाविद्यालये सुरु झाली आहेत़ यामुळे प्रवेशासह इतर कामांसाठी विद्यार्थी, पालकांची झुंबड उडाली आहे़ शैक्षणिक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थी, पालकांना रहिवासी, उत्पन्न, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर अशी विविध प्रमाणपत्रे लागतात़ या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी, पालक सध्या गेवराई तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणवर येत आहेत़येथील तहसीलच्या आवारात दलालांचा विळखा असून येथे पंधरा ते वीस दलाल बसलेले असतात. तहसीलमध्ये विद्यार्थी-पालक येताच त्यांना दलाल गाढतात व आपण प्रमाणपत्र ताबडतोब काढून देतो, म्हणत त्यांना गळ घालतात. तहसीलमध्ये प्रमाणपत्र काढण्यास वेळ लागतो, शिवाय खेटेही घालावे लागतात तसेच प्रमाणपत्र काढण्यासंदर्भात ग्रामस्थांना माहितीही नसते, या संधीचा फायदा दलाल घेतात. विशेष म्हणजे दलाल व तहसीलमधील काही कर्मचाऱ्यांचे संगनमत आहे. त्यामुळे अधिक पैसे मोजले की, ताबडतोब प्रमाणपत्र मिळते व जे पालक, विद्यार्थी पैसे देत नाहीत, त्यांना खेटे घालावे लागतात. असा प्रकार येथे सर्रास होत असल्याने येथील दलालांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अक्षय पवार, मुकुंद बाबर, डॉ. शेख इब्राहिम यांच्यासह इतरांनी केली आहे. या संदर्भात तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले की, नागरिकांनी प्रमाणपत्रांसाठी दलालांकडे जाऊ नये, तहसीलच्या आवारात असे प्रकार होत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल. (वार्ताहर)
गेवराई तहसील आवारात दलालांची मिरासदारी
By admin | Updated: June 28, 2014 01:14 IST