लातूर : शहरातील तावरजा कॉलनी भागात एका १८ वर्षीय तरुणीचा व्हिडिओ क्लीप दाखवून तुझी बदनामी करतो, असा दम देऊन तिघांनी छळ सुरु केला होता. या तिघांच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील तावरजा कॉलनी भागात राहणारे खाजा हकिम शेख, शादुल शब्बीर शेख (पानगाववाले), शमा हकिम शेख (सर्व रा. संजय नगर, लातूर) अशी त्यांची नावे आहेत. नवीन वर्षाच्या प्रारंभी खाजा शेख याने सरबतमध्ये गुंगीचे औषध टाकून सदरील महिलेस पिण्यास दिले व छेडछाडीचा प्रयत्न केला. त्या घटनेची व्हिडिओ शुटिंग शादुल शेख व शमा शेख या दोघांनी केली. ती क्लीप दाखवून तुझी बदनामी करू अन्यथा चाकूर येथे आमच्याबरोबर चल, अशी धमकी देताच त्या महिलेने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ तिला उपचारासाठी लातूरच्या शासकीय दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार गांधी चौक पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)
व्हिडिओ क्लीप दाखवून बदनामीची धमकी
By admin | Updated: January 12, 2015 14:17 IST